सातारा : दहा वर्षे जावलीचे सत्ताधारी आमदार होता, जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच संबंधित जलसंपदा खात्याचे मंत्री असतानासुद्धा तुम्ही बोंडारवाडी घरणासाठी तोंडातून चकार शब्द काढला नाही. आता आपले मोठेपणा दाखवण्यासाठी बोंडारवाडी धरण मी केले असते, असं म्हणून निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करत आहात. परंतु तुमच्या या भूलथापांना जावलीची जनता भूलणार नाही, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी आ.शशिकांत शिंदे यांच्यावर केली. रांजणे यांनी आ.शशिकांत शिंदे यांच्या जावळीतील सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातील भाषणावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीकास्त्र सोडले आहे.
रांजणे यांनी पत्रकात म्हटले आहे की, आ.शशिकांत शिंदे यांनी मी आमदार असतो तर बोंडारवाडी धरण झाल्याशिवाय पाण्याचा एक थेंब खाली जाऊ दिला नसता, अशी बालिश बडबड करून जावलीकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल समस्त जावलीकरांचा त्यांना सवाल आहे की
तुम्ही आमचे दहा वर्ष आमदार होता या जिल्ह्याचे पालकमंत्री नव्हे तर त्या संबंधित जलसंपदा खात्याचे मंत्री होता. मग त्यावेळी बोंडारवाडी धरणासाठी तुम्ही किती प्रयत्न केले ते सांगा. धरणाला मंजुरी देऊन निधीची तरतूद तरी करायची पण तुमचा जीव कोरेगावात गुंतला होता. जावळीची जनता केवळ तुम्हाला कामापुरतीच हवी असते, याची जाणीव समस्त जावलीकरांना झाली आहे. त्यामुळे अशा भावनिक वल्गना करून कोणीही भूलणार नाही, हे लक्षात ठेवावे.
बोंडारवाडी धरण हे आमचे नेते मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करणार आहेत. मंत्री शिवेंद्रराजेंनी बोंडारवाडीच्या एक टीएमसी पाण्याला मंजुरी दिली आहे. ट्रायलपिट होऊन आगामी काळात धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होईल. त्यामुळे तुम्ही काही काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही खूप मोठे झालात ते जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या सहकायनिच. तुम्हाला आणखी किती मोठे व्हायचे आहे? कोणीही तुमच्या आड आले नाही हे राजकारण आहे ते राजकारणाच्या पद्धतीनेच होणार. उगाच स्वतःच अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडणे थांबवा, असेही रांजणे म्हणाले.