Wednesday, April 15, 2026
spot_img
Home Maharashtra वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रवृतींचा कठोर कायद्याद्वारे बंदोबस्त व्हावा खा उदयनराजे भोसले

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रवृतींचा कठोर कायद्याद्वारे बंदोबस्त व्हावा खा उदयनराजे भोसले

251
Adv

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली राज्य कारभारात रयतेच्या सह भागाव्दारे लोकशाहीचा पाया रचला. लोककल्याणासाठी अहोरात्र आयुष्य वेचले. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करतात.यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळुन,समाजामध्ये दुफळी पसरते.अश्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची किंवा चौरंग करण्याची धमक आमच्यासह शिव प्रेमींमध्ये निश्चित आहे परंतु आम्ही संयम राखुन आहोत. केंद्र व राज्यशासनाने अश्या प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका/ टाडा सारखा अजामिनपात्र आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची व जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार राहणार नाही अश्या रोखठोक शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त करीत, केंद्रीय मंत्री ना.अमित शहा यांना समक्ष भेटुन याबाबतचे निवेदन दिले.

देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांची आज दिल्ली येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट घेवून, विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेत तसेच दिलेल्या निवेदनात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले की, राज्यशासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करुन, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिध्द करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती, त्याला जसे समजले, वाटते आहे अश्या पध्दतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण विवाद निर्माण करतो. अश्या प्रवृत्तींमुळे समाजामध्ये दुही पसरतेच परंतु राज्यातील देशातील कायदा आणि सुव्यवस्था देखिल बिघडते. शेजारी राहणा-यांची मने कुलूषित होतात आणि त्याचे दिर्घ परिणाम समाजाला भोगावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करावा त्याचबरोबरीने अश्या प्रवृत्तींचेबाबतीत कायदेशीर कारवाई करता येणारा तसेच , किमान 10 वर्षाची शिक्षा असणारा अजामिनपात्र विशेष कायदा पारित करावा.
ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसिरिज, डॉक्युमेंटरीज यांचे चित्रिकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभुत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेवून सेन्सॉरशिप देण्यात यावी जेणेकरुन सभाव्य विरोधाभास टाळण्याचे आणि समाजस्वास्थ अबाधित राखणे शक्य होईल अशी सूचना देखिल यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वाचा अतुलनीय वारसा आपल्याला लाभला आहे.सपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची प्रचिती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारणे गरजेचे आहे या स्मारकामध्ये राष्ट्रीय आणि आतर्राष्ट्रीय स्तरावरुन संशोधन आणि संकलित केलेले छत्रपतींविषयी अप्रकाशित दस्तावेज, चित्रे,शस्त्रांस्त्रे, ऐतिहासिक नोंदी, चित्रे,कलाकृती, युध्दनिती,इत्यादींचा समावेश असावा.
तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वडील, स्वराज्याचे संकल्पक, शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे.आर्किलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने हे क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहिर केलेले आहे. स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातुन सत्यात उतरवण्यासाठी अखंड परिश्रम घेणा-या आणि युध्दामध्ये गनिमी काव्याचा युध्दमंत्र देणा-या शहाजीराजेंची समाधी दुर्लक्षित आणि अविकसित राहाणे हे न पटणारे आहे. 23 जानेवारी 1664 रोजी अंतिम श्वास घेतलेल्या शहाजीराजेंच्या असामान्य व्यक्तीमत्वाची समाधि व आजुबाजुचा परिसराचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने भरीव निधी उपलब्ध करुन देणे हे केंद्राचे कर्तव्य आहे.

मराठा साम्राज्याचा किंबहुना छत्रपतींच्या काळात, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक घटना घडल्या त्याचे साक्षीदार असलेल्या स्वराज्याच्या चार राजधानी व अन्य ऐतिहासिक ठिकाणांचे शिवस्वराज्य सर्किट निर्माण केल्यास,गडकिल्यांचे जतन होवून,भावी पिढीला चिरंतन प्रेरणा मिळणार आहे.त्यामुळे पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील किल्ले राजगड,किल्ले रायगड,किल्ले अजिंक्यतारा या तीन राजधानी किल्ले व परिसराचा विकास करावा त्यानंतर दुस-या टप्यात राजधानी जिंजी (कर्नाटक), पानीपत,आग्रा, इंदूर, ग्वालियर, तंजावर, यासह अन्य ठिकाणच्या विकासाचे धोरण आखावे.
मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणेची पायाभरणी झाली आहे. तथापि अनेक वर्षे या स्मारकाला गती मिळालेली नाही. याबाबत शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी बरोबरच असंतोष जाणवत आहे. सदरचे स्मारक महाराष्ट्राची असिमता आहे. जगातील सर्वांत मोठे आणि सर्वांगसुंदर असे स्मारक उभारण्याचा आपला मनोदय आहे. हा आपला मनोदय कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवेदन आणि चर्चेमध्ये आलेल्या मुदयांविषयी अत्यंत गंभीर नोंद घेत,पृष्ठांकन करुन सूचना निर्गमित केल्या.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे समवेत, काका धुमाळ,ॲड विनित पाटील, कुलदिपअण्णा क्षिरसागर,करण यादव,उपस्थित होते.

Adv