Thursday, April 16, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District रेल्वेमंत्री यांची छ उदयनराजे भोसले यांनी घेतली भेट

रेल्वेमंत्री यांची छ उदयनराजे भोसले यांनी घेतली भेट

298
Adv

साताराः सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली.रेल्वेमार्ग दुपदरी करणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तातडीने पाहणी करण्याच्या सूचना श्री.वैष्णव यांनी दिल्या.
रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे पार्ले, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीतील काही शेतांकडे आणि लोकवस्त्यांकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत. काही ठिकाणी तारेचे कुंपण केल्यामुळे शेतीमालाची ने-आण करताना प्रचंड गैरसोय होत आहे.सरपंच आणि ग्रामस्थांनी खा.श्री.छ.उदयनराजेंची भेट घेतली होती. ही समस्या अग्रक्रमाने सोडविण्याची विनंती खा.श्री.छ.उदयनराजेंनी श्री. वैष्णव यांना केली. या ठिकाणी अंडरपास काढून रस्ते तयार केल्यास केवळ पार्लेच नव्हे तर वडोली निळेश्वर, रिसवड आणि लगतच्या अनेक गावांना लाभ होणार आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत तातडीने तांत्रिक पाहणी करण्याच्या सूचना श्री. वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
लोणंद हे पुणे-सातारा रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, भविष्यात ते जंक्शन होण्याची गरज आहे. या स्थानकाचा फायदा सातारा जिल्ह्यासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनाही होतो. दर्शन एक्सप्रेस, कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस, पूर्णा एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस आणि दादर-हुबळी एक्सप्रेस या प्रमुख गाड्यांना लोणंदला थांबा द्यावा, फलाट क्रमाक एकची लांबी वाढवावी तसेच स्थानक परिसराचे सुशोभीकरण करावे, अशा मागण्या लोणंद प्रवासी संघटनेने खा. श्री. छ. उदयनराजे यांच्याकडे केल्या होत्या. याविषयीही सकारात्मक चर्चा होऊन श्री. वैष्णव यांनी योग्य कार्यवाहीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
‘अजिंक्यतारा एक्सप्रेस’ची मागणी
सातारा सैनिकांचा जिल्हा असल्याने सुटीसाठी येणाऱ्या जवानांच्या सोयीसाठी यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि कर्नाटक क्रांती एक्सप्रेस या गाड्यांना साताऱ्यात थांबा देण्याची मागणी खा.श्री.छ.उदयनराजेंनी केली. सह्याद्री एक्सप्रेस ऐवजी सुरू करण्यात आलेली नवी गाडी पुण्यापर्यंतच न चालवता मुंबईपर्यंत चालवण्यात यावी, कामानिमित्त पुण्यास ये-जा करणाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे-बेळगाव इंटरसिटी गाडी सुरू करावी, मुंबई ते पंढरपूर अशी गाडी सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरजमार्गे सुरू करून तिला ‘अजिंक्यतारा एक्सप्रेस’ नाव द्यावे, झेलम, दुरांतोसारख्या गाड्या पुण्याऐवजी मिरज, कोल्हापूरपर्यंत सुरू कराव्यात,साताऱ्यात पिट लाइन,गाड्यांच्या देखभालीची तसेच रेल्वेत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करावी,अशा मागण्या खा.श्री.छ.उदयनराजेंनी यावेळी केल्या.
कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाद्वारे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेसाठी हा प्रकल्प हाती घेण्याची विनंती श्री. छ. उदयनराजे यांनी श्री. वैष्णव यांना केली असता,या रेल्वेमार्गाचा नवा डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले असून, तवकरच ते पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. सातारा पोस्ट कार्यालयाच्या डागडुजी,दुरुस्तीसाठी केलेल्या निधीच्या मागणीस मंजुरी दिल्याबद्दल खा.श्री.छ. उदयनराजे यांनी श्री. वैष्णव यांचे आभार मानले, तसेच या कामांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी केली.

Adv