महाबळेश्वर-पांचगणीच्या अनाधिकृत बांधकामाबाबत निश्चित पॉलीसी ठरवा. छ उदयनराजे भोसले

313
Adv

जिल्हाधिकारी,सातारा यांनी महाबळेश्वर-पांचगणी परिसरातील अनाधिकृत बांधकामे सरसकट पाडण्याबाबत दिलेल्या आदेशा बाबत, महाबळेश्वर तालुक्यात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभुमीवर आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांना लेखी निवेदन दिले आहे. सदरचे निवेदन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रितम
कळकसकर यांनी जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी यांना सादर केले.

खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,भारतातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणा-या महाबळेश्वर आणि पांचगणी परिसर इको सेन्सेटीव झोनमध्ये समाविष्ट आहे.याठिकाणी पर्यावरणरक्षणासाठी अनाधिकृत बांधकामांना आवर घालणे आणि पर्यावरण पूरक उपाययोजना करणे हे नक्कीच आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने आपण, महाबळेश्वर तहसिलदार यांना अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे तसेच त्यांचे पाणीआणि वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिलेले आहेत.आपली ही कृती निश्चितच स्वागतार्ह आहे. तथापि वृत्तपत्रातप्रसिध्द झालेल्या बातमीनुसार, याबाबतचे धोरणात्मक नियमावली किंवा निकष आपण ठरविलेले आहेत किंवा नाही याचा बोध होत नाही.तसेच एकूणच साधक बाधक विचार न होता सरसकट बांधकामे पाडण्याबाबत आपण आदेश दिले आहेत असा सूर येथील नागरीकांमध्ये दिसून येत आहे.तरी आपणास विनंती सूचना करण्यात येते की, पिढयान पिढया राहणा-या कुटुंबांच्या तसेच स्थानिकभुमिपूत्र असलेल्या कुटुंबांच्या सध्याच्या बांधकामाला संरक्षण देणे आवश्यक आहे. धनधांडग्यांनी कवडीमोल दराने जागा घेवून ज्यांनी बढेजाव निर्माण करण्यासाठी अलिशान बांधकामे केली आहेत ती निश्चितच हटवण्यात आली पाहीजेत त्याचबरोबरीने हातावरचे पोट असणारे स्थानिक रोजगार मिळवणा-यांच्या गरजेपुरते उभे केलेल्या बांधकामांना सरक्षण देणेही तितकेच आवश्यक आहे.
याकामी संबंधीत सर्व लोकप्रतिनिधींची आपण बैठक बोलवावी. निश्चयात्मक धोरणात्मक निर्णय घेवून,तसेच कोणते अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे याचे निकष ठरवावेत.त्यानंतरच याबाबतची अंतिम कार्यवाही होणे गरजेचे आहे अशी भुमिपुत्रांच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विनंती केली आहे.

Adv