Friday, April 3, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City मध्यावधी निवडणुकांचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा ‘खो’

मध्यावधी निवडणुकांचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा ‘खो’

141
Adv

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला यश आलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली खेचल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्याकडून पक्ष देखील हिरावून घेतला आहे. पक्षाचे बहुतांश लोकप्रतिनिधी शिंदे यांच्या समर्थनात असल्याने निवडणूक आयोगाने हाच निकष मानून शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे व समर्थकांना बहाल केले आहे. प्रथम मुख्यमंत्रीपदाची खुर्ची नंतर पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र आता संघर्ष हा एकमेव पर्याय उरल्याचं दिसत आहे.

अशातच, पुणे व पिंपरी येथे पोटनिवडणुका लागल्या असून येथे उद्धव ठाकरे यांचा गट प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसला तरी महाविकास आघाडीचा घटक असल्याने धंगेकर व काटे या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्यांचा पाठिंबा आहे. कसबा पोटनिवडणुकीत उभे असलेल्या धंगेकर यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी त्यांनी, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीचा संदर्भ देत राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागू शकतात असा अंदाजही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

मात्र उद्धव ठाकरे यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खो दिला आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर शरद पवार यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. मात्र राज्यात सध्या मध्यावधी निवडणुका लागतील असं चित्र आपल्याला दिसत नसल्याचं पवार यावेळी म्हणाले. पवार यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला मात्र खो बसला आहे.

Adv