श्री चवणेश्वराची शनिवारपासून वार्षिक यात्रा

500
Adv

पिंपोडे बुद्रुक, दि. . कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चवणेश्वर येथील श्री चवणेश्वराची वार्षिक यात्रा शनिवार (दि. 22) व रविवारी (दि. 23 ऑक्टोबर)असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच दयानंद शेरे व मंदिराचे पुजारी रमेश पवार (गुरव) यांनी दिली.
कोरेगाव व वाई तालुक्याच्या सीमेवर समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर चवणेश्वर हे ऐतिहासिक ठिकाण आहे. देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांचे मित्र सप्तर्षीपैकी एक भृगपुत्र ’चवणऋषी’ यांची ही तपोभूमी. चवणऋषींची तपोभूमी म्हणून या गावाचे वेगळेच महत्व असल्यामुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक याठिकाणी येत असतात. चवणेश्वर येथे श्री. चवणेश्वर, श्री. महादेव व जानुवाई देवीची मंदिरे असून या मंदिरांचा जिर्णोध्दार काही वर्षांपूर्वी उद्योगपती मधुकर मुसळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सहकार्यातून झाला आहे. या जीर्णोध्दारामुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून दिवसेंदिवस चवणेश्वर येथे भक्तांच्या गर्दीत वाढ होताना दिसत आहे.
दरवर्षी अश्विन महिन्यातील चौथा शनिवार व रविवारी श्री चवणेश्वराची यात्रा भरते. शनिवारी रात्री श्री चवणेश्वराचा गावातून छविना निघतो त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी गावातील मानाची लोटांगणे होतात. दुपारी श्री चवणेश्वराची सासनकाठी व गुळुंबच्या सासनकाठीची भेट होते. यावेळी वाण्याचीवाडी, वरखडवाडी, करंजखोप, रणदुल्लाबाद, मोरबेंद, सोनके, हिवरे, तरडगाव आदी ठिकाणांहून सासनकाठ्या येत असतात. सासनकाठ्यांचा भेट सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. यात्रेदिवशी मंदिर परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, अशी येथील अख्यायिका असून या सोहळ्यासाठी राज्याच्या कानोकोपर्‍यातून भाविक याठिकाणी येत असतात.
चवणेश्वर गावास सन 2000 पासून पर्यटनस्थळ ‘क’ वर्ग दर्जा मिळाला असल्याने याठिकाणचा कायापालट होत आहे. चवणेश्वरचे सरपंच दयानंद शेरे व त्यांच्या सहकार्‍यांनी गावच्या अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या चार वर्षात चवणेश्वर येथे विविध विकासकामे मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे. यात्रेसाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. करंजखोप ते चवणेश्वर या घाटातील रस्त्यास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन तो मार्गी लागला आहे. करंजखोप ते चवणेश्वर या उर्वरित रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटनमधून दोन कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे कामही लवकरच मार्गी लागणार आहे. मंदिरासमोरील विहिरीला रिंग टाकण्यात आली आहे. लोटांगणे मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्यावतीने वीजपुरवठा करण्याबरोबरच हायमास्कची उभारणी केली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने वीज, पाणी, रस्त्यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रा उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन सरपंच दयानंद शेरे व ग्रामस्थांनी केले आहे.

Adv