सातारा कराड येथे वनविभागाचा पूजा साहित्य दुकानांवर छापा 87 किलो चंदन व सहाशे मोरपिसे जप्त – एकाला अटक

526
Adv

सातारा वन विभागाने सातारा व कराड शहरात पूजा साहित्य विक्री करणाऱ्या सहा दु कानांवर कारवाई करून 87 किलो चंदन व सहाशे मोरपीसे, व इंद्रजाल नावाचा दुर्मिळ सागरी जीव या कारवाईत जप्त केला आहे . या तस्करीमागे आंतरराज्य टोळी असल्याचा वनविभागाचा संशय असून याच धर्तीवर सांगली व कोल्हापूर जिल्हयातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली .

मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार साताऱ्यात दत्त पूजा भांडार, पंचमुखी पूजा साहित्य, तर शाहू स्टेडियममधील कोटेश्वर पूजा साहित्य तसेच कराडमधील तीन संशयित दुकानांची तपासणी करण्यात येत आहे . दत्त पूजा भांडारचा मालक संतोष लक्ष्मण घोणे याला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसाची वनकोठडी न्यायालयाने सुनावली आहे . घोणे याच्याकडून 87 किलो चंदन व सहाशे मोरपिसे आढळून आली .पंचमुखी पूजा साहित्य या दुकानाचे मालक दत्तात्रय धुरपे यांच्याकडून साडेआठ किलोचे चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले .कोटेश्वर पूजा साहित्यचे राहुल विजय निकम याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे हत्ता जोडी, घोरपड प्राण्याच्या शरीराचा भाग असलेले नऊ अवशेष व मोरपिसे आढळून आली . वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व जैवविविधता कायदा 2002 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

मोहिते पुढे म्हणाले या चौकशीमध्ये या प्रकरणामागे आंतरराज्य टोळी असल्याचा संशय आहे . सातारा सांगली कोल्हापूर येथे झालेल्या वन विभागाच्या धडक कारवाईचे समान संदर्भ तपशीला मध्ये तपासले जात आहेत . या प्रकरणाचे आणखी काही नवीन धागेदोरे पुढे येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली . उपवनसंरक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनपाल प्रशांत पडवळ, वनरक्षक सुहास भोसले, साधना राठोड, राजू मोसलगी, अशोक मलप, सूर्याजी ठोंबरे, सुरेश गभाले, संतोष दळवी यांनी कारवाईत भाग घेतला होता .

Adv