पर्यटनस्थळ चवणेश्वरचा 1 कोटी 33 लाखांचा निधी परत मिळाला ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

473
Adv

पिंपोडे बुद्रुक,दि*.23*(प्रतिनिधी)-*
पर्यटनस्थळाचा ‘क’ वर्ग दर्जा असलेल्या चवणेश्वरचा (ता. कोरेगाव) 1 कोटी 33 लाख रुपयांचा शिल्लक निधी लॉकडाऊन काळात शासनाकडे परत गेला होता. परिणामी चवणेश्वर ग्रामस्थांसह पर्यटक, भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.आ.दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जि प चे कृषीसभापती मंगेश धुमाळ यांनी शासन स्तरावर केलेल्या प्रयत्नानंतर परत गेलेला निधी शासनाकडून पुन्हा मिळाला आहे. या निधीतील 25 लाख रुपयांचे तात्काळ वितरण करण्यात आले आहे.

कोरेगाव व वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या चवणेश्वर गावाला वीस वर्षापूर्वी पर्यटन स्थळाचा क वर्ग दर्जा मिळाला होता. यासाठी जागरूक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले होते. यामुळेच राज्य शासनाने सुमारे एक कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला होता. वनविभागाची अडचणी असल्याने सदरचा निधी खर्च झाला नव्हता. 2019 मध्ये वनविभागाची अडसर दूर झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया गतीने होण्याची आवश्यकता होती मात्र तसे झाले नाही. यादरम्यानच्या काळात राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झाला. सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली नाही. यासाठी संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित ठेकेदाराने या कामासाठी लागणारी अनामत रक्कम वेळेत न भरल्यामुळे हे काम रखडल्यानेच मंजूर झालेला निधी परत गेल्याचा आरोप झाला. निधी परत गेल्याने ग्रामस्थांसह भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या रस्त्याचा निधी परत मिळावा यासाठी चवणेश्वरचे सरपंच दयानंद शेरे, माजी सरपंच सौ. नीता पवार, हरिदास शेरे, युवराज शेरे आदींनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. एकीकडे निधी परत गेला तर दुसरीकडे रस्त्याची दुरावस्था झाल्याने अनेक संघटनांसह ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली. आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, कृषी सभापती मंगेश धुमाळ आदींकडे याबाबत पाठपुरावा केला. दै.सातारानामा याबाबत सडेतोड भूमिका घेवून निधी परत जाण्यास कारणीभूत असणारांवर कारवाईची भूमिका मांडली. संबंधित ठेकेदारावर कारवाई करुन निधी परत मिळावा यासाठी जोरदार आवाज उठवला. आ. दीपक चव्हाण यांनी घाटरस्त्याची पाहणी करुन जोपर्यंत निधी परत येत नाही तो पर्यंत श्री चवणेश्वराच्या दर्शनाला जाणार नाही अशी भूमिका घेतली.
चवणेश्वरचा परत गेलेला निधी अखेर शासनाने परत जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे.1कोटी 33 लाखांच्या रस्त्याच्या कामास नव्याने निधी उपलब्ध करण्यात आला असून त्यातील 25 लाख रुपयांचा निधी तात्काळ वितरित करण्यात येणार आहे. शासनाने निधी दिल्याने पर्यटनस्थळाचा दर्जा मिळूनही दुर्लक्षित राहिलेल्या चवणेश्वरच्या विकासाला कलाटणी मिळणार आहे.
निधी परत येईल असा विश्वास होता- आ. दीपक चव्हाण
चवणेश्वर गावच्या विकासासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मध्यंतरी रस्त्याचा निधी परत गेल्याने काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र श्री चवणेश्वरावर माझी अपार श्रध्दा असून हा निधी एक दिवस परत येईल असा विश्वास होता. आता निधी परत आल्याने आगामी काळात रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी आमचा पुढाकार असणार आहे. याशिवाय या गावाच्या विकासासाठी आणखी काय करावे लागेल त्याचे नियोजन करणार असल्याची प्रतिक्रिया आ चव्हाण यांनी दिली.

Adv