पालिकेतून पाणीपुरवठा सभापतीसह संदीप सावंत गायब पाणी पुरवठ्याचा लोड उपनगराध्यक्ष शेंडे यांच्यावर

208
Adv

सातारा शहरात घंटेवारी करणाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून पाणी पुरवण्याच्या तांत्रिक अडचणीने शहराच्या पश्‍चिम भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी पालिकेत यायचे सोडून दिल्याने पाणी पुरवठा विभागाला कोणी वाली नसल्याचे चित्र सध्या आहे. पाणीपुरवठा कर्मचारी संदीप सावंत ही सभापतींच्या पावलावर पाऊल ठेवून नगरपालिकेत फिरकत नाही त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा सर्व लोड उपनगराध्यक्ष शेंडे यांच्यावर येऊन बसला आहे

नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी बोगदा ते शाहू चौक यादरम्यान पुरेशा पाणी पुरवठ्याअभावी नागरिकांची गैरसोय झाली होती. तेव्हापासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत योग्य समन्वयाअभावी घंटेवारीची बोंब झाली आहे. घोरपडे कॉलनीत पाण्याची जुनी लाइन परस्पर बंद करण्यात आल्याने नागरिकांच्या घरात पाणीच येईना झाले आहे. शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या उपसा पंपाचा ऍटो स्टार्टर खराब झाल्याने पाणीपुरवठा दीड तास उशिराने झाल्याची माहिती आज देण्यात आली. शहराच्या विविध भागांत अपुऱ्या पाणीपुरवठयाची समस्या भेडसावत आहे. सध्या पालिकेकडे एकच नळकरी उपलब्ध असल्याने पाणीपुरवठा करताना पालिकेची तारांबळ होऊ लागली आहे.

सातारा शहराला शहापूरच्या जकातवाडी येथील मुख्य जलशुध्दीकरण केंद्रातून खाणीची टाकी- पॉवर हाऊस टाकी- गणेश टाकी व गुरूवार बाग टाकी व घोरपडे टाकी असा शहराच्या पश्‍चिमेकडून पूर्वेला पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक वॉर्डाला साधारण पंचेचाळीस मिनिटाची घंटेवारी ठरवून देण्यात आली आहे. उपळी येथील दीडशे हॉर्स पॉवरची मोटार वारंवार नादुरुस्तीचे कारण देऊन घंटेवारी उशिरा केली जाते. नंतर मोटारचा ऍटो स्टार्टर बंद पडल्याने बोगदा ते शाहू चौक या मार्गावरील उर्वरीत टाक्‍यांना लेव्हल न मिळाल्याने पाणीपुरवठा ठप्प होत आहे.

मात्र, यामध्ये घंटेवारीचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. शहराच्या पश्‍चिम भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. केसरकर पेठेत पाणी टंचाई तीव्र झाल्याने आरोग्य सभापतींचा फोन सातत्याने खणखणत आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाची समन्वय यंत्रणाच उपलब्ध नसल्याने नागरिकांची परवड होत असून पाण्याची ओरड सुरूच आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. शहराच्या हद्दवाढीमुळे नवीन नळकनेक्‍शनची संख्या वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाचे एक दोन कर्मचारी वगळता बाकीच्यांचा पत्ता नसल्याने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या पाच महिन्यांपासून दालनाकडे फिरकले नाहीत. तर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अनिरूद्ध गाढवे यांची तीन दिवस पाचगणी तीन दिवस सातारा अशी यात्रा सुरू आहे. अभियंता सावळकर यांची वाईला बदली झाली कुठे पाणीपुरवठ्याची लाइन नादुरुस्त झाली तर पालिकेकडे एकच प्लंबर आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे पाणी नक्की मुरतयं कुठे व दुरुस्तीची बिले लाखांत निघतात कशी, याची शोधमोहिम बापट यांनी सुरू केली आहे.

Adv