साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी तालुकास्तरावरील रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे असून त्यावर जिल्हा प्रशासनाने काम करावे, अशा सूचना विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केल्या.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. अशाप्रसंगी क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सोय असल्यामुळे येथेच मोठा ताण पडतो. त्यासाठी तालुक्यातील रुग्णालये आणि ग्रामीण प्राथमिक रुग्णालयांची क्षमता वृध्दींगत करावी, अशा सूचना विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या.
जिल्ह्यात अधिकाधिक ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्याबरोबर विविध खाजगी कंपन्या आणि इतर आस्थापनांकडे असलेले ऑक्सिजन सिलेंडर ताबडतोब प्रशासनाने ताब्यात घ्यावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील कोविड रुग्णालयाचे अधिक गतीने काम करुन तात्काळ जिल्हावासियांच्या सेवेत हे रुग्णालय सुरु करता येईल असे आमचे प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.






