खंडणी, अपहरण व गंभीर स्वरूपाची मारामारी असे गुन्हे दाखल असणारे सुनील काळेकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून झालेली निवड रद्द करावी अशी मागणी आरपीआय ( आठवले गट )चे शहराध्यक्ष जयवंत शिवदास कांबळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे .
कांबळे यांनी गुरुवारी निवासी उपजिल्हा अधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन सादर केले . या निवेदनात नमूद आहे की शासनाने स्वीकृत नगरसेवक निवडीचे नियम कठोर केले आहेत . . संबधित उमेदवार हा चारित्र्यसंपन्न व उत्तुंग सामाजिक कार्याची पाश्र्वभूमी असणारा असावा लागतो . काळेकर यांच्यावर खंडणी व अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत . त्यांच्या निवडीने समाजात चुकीचा संदेश जात असून भाजपची सुध्दा प्रतिमा मलीनं होत आहे . काळेकर यांची निवड रद्द करून त्या जागेवर प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळावी व हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात म्हणून ही लेखी मागणी आपण करत असल्याचे जयवंत कांबळे यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे .