पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला ‘जनता कर्फ्यू’

32
Adv

इथून पुढचा काही काळ आपण सामाजिक अंतर ठेवून वागणच हितकारक आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विज्ञानाला अजूनही ठोस उपाय सापडला नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा वेळ सुजाण भारतीय नागरिक म्हणून मला द्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्यांनाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केलं.

करोना व्हायरसने जगभर थैमान घातलेलं असताना लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारे वेगवेगळी पावलं उचलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाचा पालक या नात्याने आपलं मत आज देशासमोर मांडलं. कुणी स्वतःला कितीही सशक्त समजत असला तरी येत्या दोन आठवड्यासाठी कृपा करुन कोणताही धोका पत्करू नका. ज्येष्ठ नागरिकांना शक्य तितकं जपण्याचा प्रयत्न करा असं सांगत जगभरात कोरोनाशी लढण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांवर मोदींनी भाष्य केलं. माध्यमांना, बँक कर्मचाऱ्यांना दरम्यानच्या काळात सतर्क राहणं गरजेचं आहे, त्यांची धावपळ मी समजू शकतो पण त्यांनीही आरोग्याची खबरदारी घेतच सर्व गोष्टींचा सामना करावा असंही मोदी पुढे म्हणाले.
जनता कर्फ्युचं आवाहन
येत्या रविवारी म्हणजेच २२ मार्च रोजी जनता कर्फ्युचं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं. या कर्फ्युमध्ये सकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत कुणीच घराबाहेर पडू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा असं मत नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं. देशातील सुशिक्षीत बांधवांनी हा संदेश प्रत्येकी १० लोकांपर्यंत पोहचवावा असंही मोदी पुढे म्हणाले. रुग्णांवर उपचार करण्यात मग्न असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सलाम करायला हवा. त्यांच्या धाडसाचं आणि सातत्यपूर्ण कार्यशीलतेचं करावं तितकं कौतुक थोडेच आहे असे प्रशंसापूर्ण उद्गार नरेंद्र मोदींनी काढले.
बँक आणि व्यापाऱ्यांना सहकार्याच आवाहन
आर्थिक पातळीवर होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी सर्वांनी मानवतावादी दृष्टीकोनाने विचार करुन पुढे जायला हवं असं मोदी यावेळी म्हणाले. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मध्यमवर्ग आणि सामान्य नागरिकांचं अतोनात नुकसान झालेलं असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि बँकांनी सामान्य माणसाला सहकार्य करावं अशी भावनाही यावेळी मोदींनी बोलून दाखवली. मोठ्या उद्योजकांना कामगारांच्या मासिक पगारातून कपात करु नका असं सांगतानाच व्यापाऱ्यांना साठेबाजी न करता जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू न देण्याबाबतचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.

अर्धा तास संबोधनाचे सार
अर्धा तास चाललेल्या पंतप्रधानांच्या भाषणाचा रोख जनतेला जागरुक करण्यासोबतच काळजी करण्याकडे होता. मार्च महिना हा आर्थिक उलढालींसाठी महत्वाचा मानला जात असताना मोदींनी सामान्य वर्गाला दिलासा देणारं भाषण केल्यानं कोरोनाशी लढताना भारत एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत असल्याची अनुभूती यावेळी सामान्य नागरिकांना आली.

Adv