नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत प्रशासनाची अब्रू काढली चव्हाट्यावर

51
Adv

सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेचे इतिवृत्त वाचून झाल्यानंतर अविनाश कदम यांनी सुरुवातीलाच शहरातील अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आणला. सध्या सातारच्या नगरसेवकांची मोठी बदनामी झाली आहे. शहरात ज्यांनी अतिक्रमण केले आहे ते खोकीधारक हप्ते घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी हा विषय गांभिर्याने घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

त्याला दुजोरा देत नगरसेवक निशांत पाटील यांनी सातारा शहरातील आरटीओ ऑफिसच्या रस्त्यावर डझनभर अतिक्रमणे वाढली आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, श्रीमान हॉटेल परिसरात अतिक्रमणे वाढली असल्याचे सांगितले.
नविआचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी ज्याप्रमाणे अतिक्रमण धारकांवर बडगा उगारला जाणार आहे त्याचप्रमाणे पालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांवरही नियमानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली. अनेक गाळेधारकांचा करार संपला आहे. मात्र, वेळोवेळी तो वाढवून देण्यात आला आहे. अनेकजण नगरसेवकांचे नातेवाईक असल्याचा आरोप केला. अनेकजण गाळ्यांत अंतर्गत सजावट करत आहे की जसा काही गाळा त्यांचा पर्मनंट मालकीचा आहे, अशा शब्दात त्यांनी गाळेधारकांच्या प्रश्‍न मांडला.

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमणांच्या विषयांवर पालिका प्रशासनाची पुरती अब्रू निघाली . अतिक्रमणाबाबत प्रशासन ढिम्म आहे, खतपाणी घालत आहे, नगरेसवक हप्ते घेतात असे अनेक आरोप झाल्याने खडाजंगी झाली. त्यामुळे येत्या सोमवारपासून अतिक्रमण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय झाला. सभेतील अजेंडा वाचून लगोलग 15 पैकी 14 विषय मंजूर करण्यात आले. यापैकी विषय क्रमाक 12 ला नगरसेवक बनकर यांनी हरकत घेत विषय तहकूब करण्यास सांगितले.

स्नेहा नलवडे यांनी घरकुल योजेतून अनेकांना घरे मिळाली. मात्र, लाभार्थ्यांनी पैपाहुणे आणून ठेवले असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. दिपलक्ष्मी नाईक यांनी ओढ्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची मागणी केली. नगरसेवक विकास गोसावी यांनी शहरात शौचालय उभारण्यासाठी निधी मागितला. पण उपलब्ध झाला नाही. सर्व कामासाठी निधी मिळतो, पण शौचालयला का नाही असा सवाल उपस्थित केला.
विजय काटवटे यांनी स्वच्छ सर्वेक्षणची टीम कधी आली गेली कळलेच नाही. प्रशासनाने नगरसेवकांना कल्पना दिली असती तर योग्य नियोजन करता आले असते. फक्त स्वच्छ सातारा करूया अशी घोषणा करुन नंबर मिळणार नाही. कराड सारख्या शहराला चांगला नंबर मिळत असेल ते आपण कुठे कमी पडलो हे तपासावे लागेल.
अशोक मोने यांनी अतिक्रमणला पालिका प्रशासन खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. मोती चौक, खालचा रस्ता, मच्छी मार्केट याठिकाणी इतकी अतिक्रमणे झाली आहेत की एसटी नीट वळून जावू शकत नाही. याठिकाणी ट्रॅफिक जॅमची सतत अडचण असते. बहुतांश अतिक्रमणे परप्रांतियांची आहेत. त्यामुळे परप्रांतिय सातारकरांच्या बोकांडी बसलेत आणि सातारकरांची मुले पुण्या-मंुंबईला रोजगारासाठी जात आहेत. शहरात बांधकाम सुरू आहेत. त्याठिकाणी बांधकाम साहित्याचे ढिगारे रस्त्यावर पडले आहेत. कुठलाही नगरसेवक व अधिकारी याकडे लक्ष देत नाही. स्वच्छ सर्वेक्षण पहिला नंबर हवा असेल तर अगोदर प्रशासन सुधारा, अशा कानपिचक्या मोने यांनी दिल्या. अभयसिंहराजे संकुलात अतिक्रमणे पार्किंगला जागा नाही. मुख्याधिकारी म्हणून तुमचा काय वचक आहे? असा खडा सवाल मुख्याधिकारी गोरे यांना अशोक मोने यांनी दिला. घरपट्टी वसुली अवघी 28 टक्के झाली आहे. बांधकाम बाबत प्रश्‍न उपस्थित केला तर संबंधित अधिकारी जाग्यावर नसतो. त्यामुळे केवळ पाट्या टाकायच्या असतील तर अधिकार्‍यांना येथून काढले पाहिजे, असेही मोने म्हणाले.

सर्वसाधारण सभा सुरू झाल्यापासून एकमेव अतिक्रमणे आणि घरपट्टी वसूली आणि जागांवरील आरक्षण या विषयावर सविस्तर चर्चा झाली. अतिक्रमणाचा विषय गांभिर्याने घेत नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी सातारचा असा कुठलाही भाग नाही जिथे अतिक्रमणे नाहीत, असे सांगत मुख्याधिकारी गोरे यांनी अतिक्रमण मोहिम तीव्र करण्याच्या सुचना दिल्या.

Adv