
कराड उत्तरच्या निष्क्रिय आमदारांच्या डोक्यात पालकमंत्री व सहकार मंत्री पदाची इतकी हवा गेली होती की त्यांनी सुपूत्राच्या हट्टापोटी जेष्ठ वारकरी बंडातात्या कराडकर यांना माफी मागायला लावली. काय चुकले होते बंडातात्याचे? व्यसन मुक्त युवक तयार झाला पाहिजे हे काय चूकीचे आहे. पंरतु पालकमंत्री पदाचा यांना इतका माज आला होता की त्यांनी सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता वारकरी सांप्रदायच यांचा हिशोब करणार असून यांना घरी पाठवण्याची वेळ झाली आहे. अशी टीका भाजप महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारा मध्ये सुरेश तात्या पाटील यांनी केले.
पेरले ता. कराड येथे भाजप महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शेकडो ग्रामस्थांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी जयसिंगराव चव्हाण, यशवंत चव्हाण, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ, रणजित कदम, रामराव भोसले, भुषण चव्हाण व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. पेरले गावात ठिकठिकाणी मनोजदादांचे औक्षण करण्यात आले.
यावेळी बोलताना सुरेश तात्या म्हणाले, कारखान्याचे अधिकारी, कामगार संचालक मंडळाला भीती आहे. साहेबांपुढे व यांच्या सुपूत्रापुढे खांदे पाडून चालावे लागते. संचालक मंडळाला स्वातंत्र्य नाही. एक संचालक यांचाच सुपूत्र सगळा कारखाना सांभाळतो. जेष्ठांना योग्य वागणूक मिळत नाही. त्यामुळे कारखान्यातून यांच्या विरोधात उठाव आहे. नाईलाजाने कामगार प्रचार करतोय त्यांना भीती आहे. त्यांच्या याच सुपुत्रामुळे महाराष्ट्रातील हजारो युवकांना व्यसनमुक्त करणाऱ्या आमच्या गुरुवर्य बंडातात्यांना यांनी पालकमंत्री असताना माफी मागायला भाग पाडले. याचा हिशोबही या निवडणुकीत वारकरी सांप्रदाय व जनता केल्या शिवाय राहणार नाही.
यशवंतराव चव्हाण म्हणाले, मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून सक्षम उमेदवार कराड उत्तरला मिळाला आहे. आजवरचा रखडलेला विकास पुर्णत्वास नेण्यासाठी मनोज दादा निवडून आणण्यासाठी प्रत्येक मतदारांने पुढाकार घ्यावा. जेष्ठ नेते जयसिंगराव चव्हाण म्हणाले, मनोज दादा यांच्या उमेदवारीने, तरुण, जेष्ठ, महिला यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. पुढील दहा दिवस सर्वानी काम करुन मोठे मताधिक्य मनोज दादा घोरपडे यांना देवूया.
शंकर काका शेजवळ म्हणाले, भाजप महायुतीच्या माध्यमातून अनेक योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात विकास निधी आणला आहे. मनोज दादा हे जनसेवेसाठी अहोरात्र झटणारे नेते आहेत. त्यामुळे २० तारेखे पर्यत सर्वांनी जागृत राहून जास्तीजास्त मतदान महायुतीच्या उमेदवाराला करुन घ्यावा. काहीजण अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील मात्र त्यांचे ते कामच आहे. आपण मनोजदादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. २५ वर्षाचा रखडलेला विकास यापुढे निश्चित आहे.
चौकट : व्यासपीठ चालकांचे दर्शन घ्यायला मनोजदादा विसरले नाहीत…
पेरले ता.कराड येथे भाजप महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी शनिवारी सकाळी प्रचार रॅली काढली. या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी पेरले येथील जानाई मंदिरात वार्षिक पारायण सोहळ्यानिमित्त ग्रंथ वाचन सुरू होते. या ठिकाणी मनोज दादा घोरपडे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी व्यासपीठ चालकांचे मनोजदादा घोरपडे यांनी आशीर्वाद घेतले तसेच वारकरी संप्रदायाला शुभेच्छा देऊन महाराष्ट्राची परंपरा आपण जोपासली असल्याचे मत व्यक्त केले.
फोटो: पेरले येथे बोलताना मनोज दादा घोरपडे व इतर मान्यवर