जनता बँकेच्या धोरणात्मक निर्णयामुळे कर्जदारांच्या नातेवाईकांना दिलासा चेअरमन अतुल जाधव यांची माहिती

238
Adv

सर्वसामान्यांच्या जिव्हाळयाची आणि सभासदांचे हित जोपासणारी असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँकेने 2018 साली घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे कर्जदारांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. बँकेने एल.आय.सी. ऑफ इंडिया बरोबर करार करुन सभासद कर्जदारांसाठी लाईफ कव्हर विमा योजना स्विकारलेली आहे. यामध्ये बँकेच्या सभासदांना मंजूर कर्ज रक्कम अदा करतेवेळी संपूर्ण कर्ज रक्कमेचा लाईफ कव्हर विमा काढण्यात येतो त्यामुळे भविष्यात कर्जदारांबाबत दुर्देवाने काही घडल्यास संबंधित सभासद कर्जदारांच्या वारसास संपूर्ण कर्ज रक्कमेची येणेबाकी असेलली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते.

या योजनेतंर्गत बँकेच्या वाई शाखेतील मयत सभासद कर्जदार कै. महादेव तुकाराम मांढरे यांच्या वारस श्रीमती नंदा महादेव मांढरे यांना अडीच लाख रुपये, मंगळवार पेठ शाखेतील सभासद कर्जदार कै. सागवेकर यांच्या वारस श्रीमती शीतल सागवेकर यांना पन्नास हजार रुपये, पोवई नाका शाखेतील सभासद कर्जदार कै. गोरखनाथ विठ्ठल काटे यांच्या वारस श्रीमती प्रमिला गोरखनाथ काटे यांना पन्नास हजार रुपये रक्कम लाईफ कव्हर विमा योजनेव्दारे देण्यात आली.

या रक्कमेचे धनादेश बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक जयवंतराव भोसले यांच्याहस्ते अदा करण्यात आली. यावेळी बँकेचे भागधारक पॅनेलचे प्रमुख आणि संचालक विनोद कुलकर्णी, चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, उपव्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे, सेवक संचालक अनिल जठार उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. कुलकर्णी म्हणाले, जनता बँकेने सभासद कर्जदारांबाबत भविष्यात काही दुर्देवी घटना घडली व सभासद कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, मयत सभासद कर्जदारांच्या वारसास संपूर्ण कर्ज रक्कम भरण्याची जबाबदारी येते व कुटुंबावर संकट ओढवते त्यामुळे कर्ज रक्कम भरणा करण्याबाबत निर्माण होणारी आर्थिक अडचण यामुळे कुटुंबातील सदस्यांवर त्याचा फार मोठा मानसिक आघात होतो त्याबाबत विचार करुनच जनता बँक व्यवस्थापनाने हा धोरणात्मक निर्णय घेतला होता.

या निर्णयामुळे कर्जदारांच्या वारसांना दिलासा मिळत असून कर्जदारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची आर्थिक अडचण कमी होण्यास मदत होत आहे. यावेळी उपस्थित कर्जदारांच्या वारसांनी बँक व्यवस्थापनाचे आभार मानले.

Adv