सातारा पालिकेकडून हद्द वाढीतील ग्रामपंचायतीच्या मिळकती ताब्यात घेण्याच्या हालचालींना गती

59
Adv

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर आता पालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींच्या मिळकती ताब्यात घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीचे दप्तर, खुल्या जागा, इमारती कर, विविध योजना, आस्थापनेवरील कर्मचारी आदींची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी पालिकेकडून चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

शहराच्या हद्दवाढीवर गेल्या चाळीस वर्षांत अनेकदा हरकती नोंदविण्यात आल्या. नव्याने प्रारूप अधिसूचना काढण्यात आली; परंतु हा प्रश्‍न काही मार्गी लागत नव्हता. अखेर दि. 8 सप्टेंबर रोजी शासनाच्या नगर विकास विभागाने शहराच्या हद्दवाढीचा अंतिम प्रस्ताव मंजूर केला. अनेक वर्षांचा प्रश्‍न मार्गी लागल्याने आता शहरासह उपनगर व त्रिशंकू भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा पालिकेत दरे, शाहूपुरी, विलासपूर या तिन्ही ग्रामपंचायतींचा समावेश झाला आहे.

तर करंजे, कोडोली, गोडोली, संभाजीनगर या ग्रामपंचायतींचा काही भाग पालिका हद्दीत आला आहे. या ग्रामपंचायतींच्या मिळकती व योजना ताब्यात घेण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. शासनाच्या नगर विकास विभागाने तसे आदेशही पालिका प्रशासनाला दिले आहेत. पालिकेकडून यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

एका पथकात दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लेखापाल आरती नांगरे-पाटील यांच्याकडे विलासपूर, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील खेड, लेखापाल हिंमत पाटील दरे खुर्द तर लेखापरीक्षक कल्याणी भाटकर यांच्या पथकाकडे शाहूपुरी ग्रामपंचायतीची माहिती संकलित करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सोपविली आहे.

ही माहिती होणार संकलित
ग्रामपंचायतीचे दप्तर, निधीची माहिती, बॅंक खाती, मिळकत कर, एकूण मिळकत, चल व अचल मालमत्तांची यादी, अशा मालमत्तांवर नावे कोणाची आहेत, खुल्या जागा, इमारतीतील दुकान गाळे, ग्रामपंचायतीने घेतलेले कर्ज, आज रोजी असणारे कर्ज, पाणीपुरवठ्याची माहिती, कचरा उतरण्याची व्यवस्था, त्याची निविदा, मुदत, ग्रामपंचायतीकडे असणारे शासनाचे अनुदान, आस्थापनेवरील मंजूर नोकरवर्ग, त्यांची सेवा पुस्तके, त्यावरील कर्मचाऱ्यांची माहिती, निवडणुकीचा तपशिल, प्रभाग रचना व त्याची माहिती, रिजनल प्लॅन, टेंडरमधील पीएफ, जीएसटी, इन्कम टॅक्‍स इत्यादींची वजावट करण्याच्या तरतुदी अशी माहिती या पथकाकडून संकलित केली जाणार आहे.

Adv