कोरोनामुळे संपूर्ण जगालाच फटका बसला असून त्यातून कोणतेही क्षेत्र सुटलेले नाही, अशावेळी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधामधून दिशा विकास मंचाच्यावतीने स्वयंसेवी संस्थांचे मार्गक्रमण या पुस्तकाचे प्रकाशन झूमच्या व्यासपीठावरुन मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. संजोग कदम यांनी व्यक्त केले. यावेळी पुणे विभागाचे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, युवा शक्ती फौंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे, दिशा विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुशांत मोरे उपस्थित होते. याप्रसंगी समाजरत्न पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
श्री.कदम पुढे म्हणाले, सामाजिक कार्याची उर्मी प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात असते. परंतु त्याला संस्थात्मक रुप दिल्यास त्याचा ख-या अर्थाने त्याचा समाजाला उपयोग होता. समाजासाठी काहीतरी करावे अशी सुप्त इच्छा प्रत्येकामध्ये असते परंतु ती पूर्ण करताना स्वयंसेवी संस्था कशी करावी, ती कशी चालवावी, सर्वांना बरोबर घेऊन कसे चालावे याबाबत अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न या पुस्तकाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रश्न दिशा विकास मंचाने केला आहे. यावेळी बाळासाहेब सोळंकी, शंकर माळवदे, संग्राम बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दिशा विकास मंचाच्यावतीने देण्यात येणा-या समाजरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 2014-15 चा पुरस्कार रत्नागिरी येथील सद्गुरुकृपा निसर्गोपचार योग ग्रामसुधार संस्थांचे अध्यक्ष महेंद्र भोसले, 2015-16 चा पुरस्कार सेवा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष युवराज भांडवलकर, 2016-17 चा पुरस्कार जालना येथील नालंदा बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे भास्कर शिंदे, 2017-18 चा पुरस्कार बुलढाणा येथील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे अमित नाफडे, 2018-19 चा पुरस्कार दिग्रस (जि. यवतमाळ) येथील दिन बहुउद्देशिय संस्थेचे इरफान शेख, 2019-20 चा पुरस्कार राजगुरुनगर (जि.पुणे)येथील पर्याय प्रतिष्ठानचे वामन बाजारे, 2020-21 चा पुरस्कार लातुर येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे हरिश्चंद्र सुडे यांना देण्यात आले. ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक आणि पुस्तकाच्या दोन प्रती असे पुरस्काराचे स्वरुप होते. प्रास्ताविकात दिशा विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष सुशांत मोरे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन नंदकुमार कदम तर आभार दीपक डफळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिशा विकास मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.