राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची भीती; मुख्यमंत्र्यांनी सतर्क राहण्याचे केले आवाहन

38
Adv

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. थंडी वाढत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सर्तक राहण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे.

राज्यातील करोना परिस्थिती व सण उत्सव साजरे करण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,”दिल्लीत प्रदूषण वाढलेले आहे. करोना आपल्या फुफ्फुसावर हल्ला करतो. दिवाळी साजरी करताना नम्र विनंती करतोय. प्रत्येक ठिकाणी बंदी आणून आणि कायदे करून आपले जीवन चालू ठेवायचे का? मी सुद्धा फटाके वाजवले आहेत. पण, आता परिस्थिती तशी नाही. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका. रोषणाई जरूर करा. दिवाळी उजळून गेली पाहिजे. पण फटाके न वाजवाल तर उत्तम. सार्वजनिक ठिकाणी वाजवू नको. मी तुमच्यावर आणीबाणी आणत नाही,” असे म्हणत ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.

“आपण सगळे सण साधेपणानं साजरे केले. मागील काही महिन्यात आपण सहकार्य केलं. पुढे दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याची चिंता आहे. तणाव आहे. सगळे सण आपण अत्यंत संयमाने साजरे केले. गर्दी वाढत चालली आहे. चांगले आहे. हे जिवंतपणाचे लक्षण आहे. इथेच एक खबरदारी घेण्याची विनंती करायची आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात करोना वाढत होता. काही जण टीका करत होते. पण आपण हा रुग्णसंख्येचा चढ खाली आणला आहे. दिल्लीत आता आकडा वाढत चालला आहे,” असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

“पाश्चिमात्य देशात अनेक ठिकाणी आकडा कमी होऊन पुन्हा वाढत आहे. ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. काही देशात घरातल्या घरातही मास्क वापरायला सक्ती केलेली आहे. थंडी सुरू होतेय. विषाणू पुन्हा वाढतोय. आता ही लाट नाही, त्सुनामी आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर, पोलीस लढत आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

Adv