
स्वराज्याचे दुसरे छत्रपती असलेल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीमहाराज यांच्या गोडोली तळे परिसरात उभारण्यात येणा-या पूर्णाकृती पुतळयाच्या प्रतिकृतीची पहाणी आज खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समवेत छत्रपती संभाजीमहाराज स्मारक प्रतिष्ठानच्या मान्यवरांकडून, आज जलमंदिर पॅलेस येथील दरबार हॉल मध्ये करण्यात आली. पुणे येथून तयार करुन आणलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा प्रतिकृती आज जलमंदिर पॅलेस, येथे अवलोकनासाठी तसेच काही सूचना असतील तर त्या सुचविणेसाठी आणण्यात आली होती.
नगरपरिषद,सातारा आणि छत्रपती संभाजीमहाराज स्मारक प्रतिष्ठान व सर्व शाहुनगरवासियांच्या वतीने, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीमहाराज यांचा पुतळा स्मारक उभारण्यात येत आहे. उभारण्यात येणारा, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कसा असेल याबाबतची प्रतिकृती तयार करण्याचे पहिल्या प्राथमिक टप्याचे पूर्ण झाले आहे., यानंतर सदर प्रतिकृतीला शासनाच्या कला संचालनालयाची परवानगी मिळण्यासाठी प्रस्तावित केली जाणार आहे. कला संचालनालयाची परवानगी मिळाल्यावर, परवानगी मिळालेल्या प्रतिकृतीप्रमाणे हुबेहूब ब्रांझचा पुतळा तयार करण्याची प्रक्रीया सुरू केली जाणार आहे.
आदरणीय राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार , सातारा येथील गोडोली तळे परिसरात छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचा निर्णय सातारा नगरपरिषदेने घेतलेला आहे. तसेच पुतळा तयार करण्यासाठी पुणेस्थित मुर्ती कलाकार श्री. संजय परदेशी यांना नगरपरिषदेचे प्रशासक अभिजीत बापट यांनी कार्यादेश दिला आहे. सदर कार्यादेशानुसार श्री. संजय परदेशी यांनी उभारण्यात येणा-या पुतळयाची प्रतिकृती तयार करुन, त्याचे निरिक्षण तसेच काही आवश्यक बदल असल्यास तसे सूचवणे इत्यादी बाबत, सदरची प्रतिकृती सातारा येथे निरिक्षणासाठी आणली होती.
सदर प्रतिकृतीची छत्रपती संभाजीमहाराज स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अत्यंत बारकाईने पहाणी केली. तसेच संभाजीमहाराज स्मारक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनीही प्रतिकृतीचे अवलोकन केले तसेच प्रतिकृतीच्या प्रत्येक भाग निर्माण करण्यामागील उद्देश, त्याबाबतचे सक्षम ऐतिहासिक दस्तावेजामधील पुष्टी इत्यादी बाबत, उपस्थित सर्वांनी निरिक्षण केले. तसेच आवश्यक त्या सूचना कलाकार श्री.संजय परदेशी यांना केल्या.
छत्रपती संभाजीमहाराज यांचा 25 फुट उंचीचा भव्य पुतळा साता-यात उभा रहात आहे. मराठयांच्या राजधानीमध्ये छत्रपती संभाजीमहाराज यांचा कोठेही पुतळा नव्हता याची आमचेसह शिवशंभुप्रेमींच्या मनात खंत होती. ती खंत किंवा उणिव आता दूर होत आहे. या पुतळा उभारणीच्या महत्वपूर्ण कार्यात सर्वांचेच योगदान आहे. सातारकरांनाच नव्हे तर जिल्हावासियांना सतत धगधगत्या इतिहासाची प्रेरणा साक्ष देणारा हा पुतळा, सुनियोजित पध्दतीने, लवकरच उभारला जाणार आहे याचे विशेष समाधान एक सातारकर म्हणून आम्हास आहे. आज प्रतिकृतीमध्ये काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार आवश्यक ते बदल करुन, ही प्रतिकृती शासनाच्या कला संचालनालयाकडे पाठविली जाईल. या संचालनालयामार्फत योग्य ती पडताळणी झाल्यावर, त्यास मान्यता मिळाल्यावर, 25 फुट उंचीचा ब्रांझ धातुमध्ये पुतळा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल.
या उभारणीमध्ये छत्रपती संभाजीमहाराज स्मारक प्रतिष्ठानचे पदाधिकारी/सदस्य सातत्याने आवश्यकते लक्ष आणि पाठपुरावा करीत आहेत लवकरच गोडोली नाका म्हणून ओळखल्या जाणा-या परिसराला वेगळे आयाम प्राप्त होतील असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी अनौपचारिक बोलताना सांगीतले.
याप्रसंगी मुर्तीकलाकार संजय परदेशी,शैलेश वरखडे यांचे बरोबर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार हरिष पाटणे, सचिव विलासनाना शिंदे, जेष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक जीवनधर चव्हाण आणि शरद काटकर, माजी उपाध्यक्ष मनोज शेंडे, चंद्रकांत पाटील, युवानेते संग्राम बर्गे, माजी सभापती सुनीलतात्या काटकर, जेष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी, अभिजीत बारटक्के, सुजित जाधव, अमोल तांगडे, ईर्शाद बागवान, काका धुमाळ यांचेसह शिव-शंभु प्रेमी उपस्थिती