पशुसंवर्धन विभागाची जागा आयटी पार्क साठी हस्तांतरित करा

418
Adv

सातारा दिनांक 7 प्रतिनिधी

गोडोली येथील पशुसंवर्धन विभागाची सुमारे 15 एकर जागा आयटी पार्क साठी उपलब्ध करून द्यावी . तसेच ही जागा या प्रस्तावाच्या प्रक्रियेसाठी उद्योग मंत्रालयाकडे हस्तांतरित करावी अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

यासंदर्भात सविस्तर माहिती पत्रकात नमूद आहे की सातारा शहरात अनेक वर्षांपासूनची आयटी पार्कची सातारा जिल्ह्यात मागणी आहे . यासाठी उपलब्ध जागेचा प्रश्न मोठा आहे . सातारा एमआयडीसी मध्ये आयटी पार्क साठी जागा अपुरी आहे, तसेच एखाद्या कंपनीला खाजगी जागेत आयटी पार्क उभारणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही . सातारा जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणी आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत .मात्र त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेचा उपयोग सातारा जिल्ह्यासाठी होत नाही . हे आयटी पार्क सातारा जिल्ह्याच्या बाहेर आहेत सातारा शहरात अद्यावत आयटी पार्क उभे राहावे ही साताऱ्याच्या उद्योग विश्वाच्या दृष्टीने काळाची गरज आहे . त्यासाठी आम्ही इनोव्हेटिव्ह सातारा ही संकल्पना मांडली आहे . त्या अंर्तगत गोडोली येथील 49 ब 49 अ व 50 अ अशी 15 एकर जागा पशुसंवर्धन विभागाची (एनिमल हजबंडरी ) आहे . ही जागा पोल्ट्री फार्म साठी आरक्षित होती मात्र सध्या येथे हा प्रकल्प कार्यरत नाही त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची ही जागा आयटी पार्क साठी हस्तांतरित करण्यात यावी . सातारा शहराच्या आसपास सुमारे 15 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत . साताऱ्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे ज्ञान घेणारे हजारो विद्यार्थी आहेत . कोविड नंतर पायाभूत सुविधांचा खर्च कमी करत अनेक कंपन्या सातारा सांगली कोल्हापूर यासारख्या छोटा शहरांमध्ये सॅटॅलाइट (उपकंपनी )ऑफिस सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत आयटी कंपन्या सुद्धा छोट्या पातळीवर गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत .

पशुसंवर्धन विभागाची ही जागा असून राष्ट्रीय महामार्गापासून 200 मीटर अंतरावर आहे . यामुळे येथे दळणवळण करणे अतिशय सुलभ होणार आहे . आयटी कंपन्यांच्या दृष्टिकोनातून विशेष आयटी झोनसाठी येथील जागेला मान्यता दिल्यास साताऱ्या सारख्या छोट्या शहराला जागतिक पातळीवर स्थान मिळणार आहे .तसेच रोजगारासाठी पुणे मुंबईला जाणारा तरुण बाहेर न जाता येथेच त्याला रोजगार उपलब्ध होणार आहे, सदर जागा नागरी वस्तीमध्ये आहे येथे आयटी कंपनी आल्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावणार असून आयटी पार्कचे कोणतेही दुष्परिणाम होणारे नाहीत . औद्योगिक कंपन्यांसारखी पर्यावरण प्रदूषण यासारख्या परवानगीची येथे आवश्यकता नाही मगरपट्टा सिटी हडपसर ,कल्याणीनगर मुंढवा, हिंजवडी येथील आयटी कंपन्या पुणे मुंबई महामार्ग लगत नागरी वस्ती मध्येच आहे . मंत्रालय पातळीवर ही जागा पशुसंवर्धन विभागाकडून तात्काळ उद्योग मंत्रालयाकडे हस्तांतरित व्हावी मुख्यमंत्री या नात्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संदर्भात आग्रही भूमिका घेऊन याबाबतची तातडीने बैठक लावावी व सदर जागेचा वस्तुस्थिती पूर्ण अहवाल त्यांनी तात्काळ सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागून घ्यावा . गोडोली येथील ही जागा सातारा आयटी कंपन्यांसाठी आरक्षित करावी अशी आग्रही मागणी उदयनराजे यांनी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे .

Adv