खाजगी शाळांना राज्य सरकारने आरटीई अंर्तगत असणारी प्रलंबित देय रक्कम तत्काळ अदा करावी ही रक्कम थकल्यामुळे संस्था चालक व पालक यांची परवड सुरू आहे . अशा आशयाचे निवेदन खासदार उदयनराजे भोसले यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सादर केले .
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी शिक्षणमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली या संदर्भात जल मंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात नमूद आहे की विद्यार्थ्यांमध्ये उद्याच्या भारतीय लोकशाहीची मुल्ये रुजवताना, आदर्श नागरीक घडवण्याची जबाबदारी शिक्षणक्षेत्राकडे जाते आणि म्हणूनच शिक्षण क्षेत्र हे अतिमहत्वाचे क्षेत्र आहे. गेल्या सुमारे दीड वर्षापासून सुरु असलेल्या करोना महामारीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या संबंधित अनेक विधायक निर्णय घेवून आपल्या शिक्षण खात्याने निश्चितच
करोना लढाईतील वाटा उचलला आहे त्याबद्दल शिक्षण मंत्रालय कौतुकास पात्र आहे. तथापि राज्यातील खाजगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी संख्येच्या २५टक्के संख्या एससी,एसटी,आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग इ.साठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला असून, अश्या २५ टक्के विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क प्रत्येक शाळेच्या
गुणात्मक निकष मुल्यांकनाव्दारे शासन प्रत्येक शाळेला प्रदान करीत असते. आजपर्यंत सन २०१८ पर्यंत असे आरटीईचे
शुल्क राज्यशासनाने संबंधीत शाळांना प्रदान केलेले आहे. त्यानंतर मात्र आज अखेर जवळजवळ तीन वर्षे असे शुल्क
वितरीत करण्यात आलेले नाही.करोना मुळे खाजगी इंग्रजी शाळा चालक आणि पालक या दोघांची शिक्षण देणे आणि शिक्षण घेणे या याविषयी परवड सुरु आहे.
शाळांनी ५० टक्के फी सवलत दिली पाहिजे अशी पालकांची मागणी आहे. विविध पालक संघ याबाबत आक्रमक होत आहेत. तर संस्थाचालकांना संस्थेचे कर्ज, गुरूजनांसह अन्य व्यक्तींचे पगार भागबणे हे मुलभुत खर्च टाळता आलेले नाही.त्यामुळे पुन्हा ५० टक्के फी सवलत देणे जिकिरीचे बनले आहे. यापार्श्वभुमीवर, राज्यसरकारकडे प्रलंबीत असलेल्या आरटीई अंतर्गतची देय असलेली थकित रक्कम इंग्रजी
शाळांना वितरीत केल्यास, इंग्रजी शाळा तरणार आहेत. संस्थाचालक काही प्रमाणात चालु शैक्षणिक वर्षामध्ये फी मध्ये
सवलत देण्याबाबत सकारात्मक भुमिका घेबू शकतील, सबब सदरची प्रलंबीत रक्कम तातडीने मिळावी अशी ईसा संघटनेची
मागणी आहे. आपण, एक अभ्यास नेतृत्व म्हणून जन सामान्यांमध्ये परिचित आहात. वस्तुस्थिती तपासून, तातडीने आरटीईची प्रलंबीत रक्कम संबंधीत संस्थांना प्रदान करणेबाबत स्वतः लक्ष घालून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी आपणाकडे आग्रही शिफारस उदयनराजे यांनी निवेदनाद्वारे केली .
यावेळी रॉबर्ट मोझेस, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, विनीत पाटील, आदी व्यक्त उपस्थित होते .






