विधीमंडळात पार पडलेल्या बैठकीत भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजप विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्यानंतर आमदारांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचेही आभार मानले. राज्यात पुन्हा महायुतीचचं सरकार स्थापन होईल. पुढची पाच वर्ष राज्याला स्थिर सरकार देणार आहोत. कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे कारभार सांभाळला. गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेक प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवले आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे येऊ शकत नाही.
भाजपने विधीमंडळात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळात हा प्रस्ताव मांडला होता. यावेळी भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी भगवे फेटे घालून मुख्यमंत्र्यांच्या नावाला अनुमोदन दिले. या प्रस्तावाला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांनी अनुमोदन दिले. याद्वारे आता भाजपाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.