सातारा जिल्हयात विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि महामार्गाचे काम सुरु आहे. विशेषत: सुरुर-वाई-महाड रस्ता रुंदीकरण करताना बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. तसेच शेंद्रे ते कागल महामार्गाचे कामही निकृष्ठ पध्दतीने सुरु आहे. याबाबत सामाजिक, माहिती अधिकार, पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदनाव्दारे विविध मागण्या केल्या होत्या. त्याची दखल घेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुर-वाई-महाड रस्त्याचे रुंदीकरण वृक्षतोड न करण्याची ग्वाही दिली. तसेच महामार्ग ठेकेदाराला सूचना करत निकृष्ठ कामाकडे लक्ष देण्याचे, महामार्ग रुंदीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले.
याबाबत अधिक माहिती अशी पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हयात सुरु असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांबाबत असणाऱ्या त्रुटींबाबत, नियमबाहय सुरु असलेल्या कामाबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंना निवेदन देऊन त्याकडे लक्ष वेधले होते. निवेदनात, शेंद्रे जि. सातारा ते कागल जि. कोल्हापूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे सुरु असलेले काम हे दर्जाहिन आहे. या कामाची निविदा ज्या ठेकेदाराला देण्यात आली आहे त्याने प्रत्येक किलोमिटर वाईज सब ठेकेदार नेमले आहेत. हे काम करताना अनेक वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यासाठी संबंधीत विभागांची परवानगी घेतलेली नाही. ज्या ठिकाणीचे काम पुर्ण झाले आहे. त्या ठिकाणी नियमाप्रमाणे नवीन वृक्ष लागवड केलेली नाही. त्यामुळे वर्क ऑर्डर मधील अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. सातारा येथून कराडकडे जाणारे अनेक शासकीय व निमशासकीय अधिकारी- कर्मचारी आहेत त्यांना या कामामुळे नाहक त्रास होत आहे. बोरगाव, नागठाणे, उंब्रजे येथील काम संथगतीने सुरु आहे.
तसेच ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरले असून त्यामुळे भविष्यात दुर्घटना झालेस मोठी वित्त व जिवित हानी होवू शकते. त्यामुळे या रस्त्याचे कामाची निविदा रद्द करावी. फेर निविदा काढावी. संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. त्याचबरोबर वाई – सुरूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, त्या अंतर्गत अनेक जुने, मोठे व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे वृक्ष तोडले जात आहेत. ही वृक्षतोड त्वरित थांबवावी. वाई हा तालुका ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे अनेक जुनी मंदिरे आहेत, जी आपल्या वारशाचे प्रतीक आहेत. शिवाय, हा रस्ता पाचगणी व महाबळेश्वर या प्रसिध्द पर्यटनस्थळांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या परिसराचा निसर्ग व पर्यावरण संरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून पाऊस कमी पडणे उन्हाळा तीव्र होऊन शेतीवरही त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करताना पर्यावरण स्नेही पर्याय निवडावेत व जुन्या वृक्षांची तोड थांबवावी. जिथे शक्य असेल तिथे रस्त्याचे मार्ग थोडे वळवून किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न व्हावा. कोणत्याही प्रकारचे काम सुरु करताना आणि त्याचे निर्णय घेताना स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्था यांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. अधिकारी आणि ठेकेदार यांचे आर्थिक लागेबांधे झाले आहेत त्यामुळे आता मंत्री महोदयानी कारभार सुधारण्यासाठी कडक भूमिका घ्यावी.
वृक्षतोड करण्यापूर्वी ठेकेदारांनी नवीन झाडे जगविण्याची जबाबदारी घ्यावी. झाडे जगवण्याचे काम ठेकेदाराने न केल्यास संबंधित ठेकेदाराला जास्तीत जास्त दंड ठोकून संबंधीत ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तत्काळ दखल घेत सुरुर-वाई-महाड रस्त्याचे रुंदीकरण वृक्षतोड न करता करण्याची ग्वाही दिली. तसेच शेंद्रे-कागल महामार्ग ठेकेदाराला कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि ठेकेदार यांचे आर्थिक लागेबांधे जुळल्याने पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे धाव घेतली.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही तातडीने हा प्रश्न मार्गी लावल्याने आता पर्यावरणाचे नुकसान टळणार आहे तसेच महामार्गाचे कामाला गती येऊन त्याचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिाया सुशांत मोरे यांनी दिली.