सातारा शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटणार आहोत. याबाबत पीएमओ कार्यालयाशी चर्चा झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही भेटून सातारा पॉटेबल वॉटर चा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहोत. त्यासाठी लागतील ते प्रयत्न आणि पाठपुरावा आम्ही स्वतः करणार अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी
शासकीय विश्रामगृह येथे इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे प्रतिनिधीशी वार्तालाप करताना दिली आहे.
सातारा जिल्हयातील शहरे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. सध्या केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानामुळे अनेक गावे ओडीएफ आणि ओडीएफ प्लस होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असलेली शौचालयांमध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. स्मार्टसिटी होण्यासाठी अनेक नवनवीन स्मार्ट संकल्पना आणि उपक्रम राबवावे लागतील. या स्मार्ट सुविधांचा उपयोग सामान्यांपासून सर्वांनी होईल. विकासाकडे झेपावयाचे असल्यास, आपली दिनचर्या खरोखरच स्मार्ट करणे आवश्यक होणार आहे. या स्मार्ट सुविधांचा सदुपयोग देखिल रोजच्या रोज करणे तितकेच जरुरीचे असणार आहे. स्मार्टसिटी करीता भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटून विशेष विनंती करणार आहोत. साता-या विषयी त्यांना विशेष आस्था आहे. त्यामुळे सातारकरांच्या हितासाठी सकारात्मक दृष्टीकोनातुन स्मार्ट सिटी बनवण्याकरीता आम्ही प्रयत्न करणार आहोत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले. सातारा जिल्हयात ११ धरणे आहेत. त्याचप्रमाणे अनेक बंधारे,के.टी.वेअर आहेत. तथापि भौगालिक परिस्थिती मुळे पश्चिमभाग अतिवृष्टीचा आणि पूर्वभाग अवर्षणग्रस्त आहे. याचा विचार करून, पॉटेबल वॉटरचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प साता-यात राबविणेत येणार आहे. त्याकरीता केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.ना.गजेंद्रसिंह शेखावत यांना भेटुन त्यांना तसा प्रस्ताब देण्यात येईल आणि जरूर तो पाठपुरावा व कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहीतीही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मिशन हॉस्पिटलचे वाईचे संचालक रॉबर्ट मोझेस आदी उपस्थित होते