सासपडे, ता. सातारा येथील सर्व गौण खाण व क्रशर हे सगळ्या कायदेशीर अटी व शर्तींचे पालन करून सुरू आहेत. खाणींची लीज मंजूर आहेत, असे असताना कुठलेही तोंडी व लेखी कारण न देता क्रशर बंद करण्यात आले आहेत. ते पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी सातारा जिल्हा खाण मालक व क्रशर मालक संघटनांच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सासपडे, ता. सातारा येथील सर्व गौण खाण व क्रशर कुठलेही तोंडी व लेखी कारण न देता मंडल अधिकारी व तलाठी यांनी सील केले आहेत. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या निर्णयानुसार प्रक्रिया केलेल्या गौणखनिज वाहतुकीसाठी रॉयल्टी भरण्याची आवश्यकता नाही असा निर्णय दिलेला आहे. माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्रक्रिया केलेल्या गौणखनिज वाहतुकीसाठी रॉयल्टी पासची गरज नाही असे उत्तर मिळाले आहे. तुमच्याकडून काही कायदेशीर त्रुटी राहिल्या असल्यास त्या पूर्ण करण्यास आम्ही तयार असून बंद केलेले गौण खनिज व क्रशर तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.






