कैलास स्मशानभूमीत सातारा पालिका चार अग्नीकुंड बसविणार खा उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

351
Adv

सातारा जिल्हयातील करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बळींची संख्या वाढत चालली असून माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व्यवस्थेवर ताण पडला आहे . ही गैरसोय टाळण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने स्मशानभूमीत उपलब्ध वीस अग्निकुंडाव्यतिरिक्त स्वतंत्र चार अग्निकुंड पत्र्याच्या शेडसह बसविण्यात येणार आहे . या स्तुत्य उपक्रमाची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली .
सातारा जिल्ह्यात कोविडच्या घातक संसर्गाने थैमान घातले असून दिवसाला तीस ते चाळीसच्या घरात बळी जात आहेत . जिल्हयाच्या ठिकाणी अर्थात साताऱ्यात जे बळी जात आहेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार माहुली येथील कैलास स्मशानभूमीत करण्यात येत आहेत . बळींचे वाढते प्रमाण आणि अग्नीकुंडांची कमतरता यामुळे अग्नीसंस्काराच्या एकूणच व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे . अंत्यसंस्कार व्यवस्थेची जवाबदारी सातारा पालिकेकडेच असून आरोग्य विभागाचे बावीस कर्मचारी तीन सत्रात सातत्याने उपलब्ध आहेत . सातारा पालिकेने हे काम अत्यंत नेटाने चालविले आहे .

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अंत्यसंस्कार व्यवस्थेवरील हा ताण कमी करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी कैलास स्मशानभूमीत स्वतंत्र चार अग्नीकुंड संपूर्ण व्यवस्थेसह बसविण्याचे पालिका प्रशासनाला आदेशित केले आहे . त्यानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तत्काळ कैलास स्मशानभूमीला भेट देऊन यंत्रणा कामाला लावली . सध्या स्मशानभूमीत वीस अग्निकुंड आहेत . पैकी दहा अग्निकुंड करोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव आहेत . मात्र करोना बळीचा आकडा पन्नाशीच्या दिशेने निघाल्याने अंत्यसंस्कारासाठी तिष्ठत राहणे आणि शिवाय कुटुंबियांना मनस्ताप असे अनुभव सध्या येत आहेत . याच गैरसोयीवर जादा अग्नीकुंड बसविण्याचा तोडगा उदयनराजे यांनी काढत तो तत्काळ अंमलात येईल याची व्यवस्था केली आहे . उपलब्ध अग्नीकुंडापासून समान अंतरावर चार नवीन अग्नीकुंड पत्र्याच्या शेडसह बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून गरजेप्रमाणे यामध्ये वाढ करणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले . हा सर्व खर्च नगरपालिका फंडातून करण्यात येणार आहे .रात्री नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संबंधित शेडमध्ये उदयनराजे यांच्या सूचनेप्रमाणे विद्युत व्यवस्था करण्यात आल्याचेही उपनगराध्यक्षांनी सांगितले .

पालिकेच्या चार अग्नीकुंडामुळे करोना संसर्गित पार्थिवाच्या अंत्यसंस्कारासाठी एकूण चौदा अग्नीकुंड उपलब्ध होणार आहेत अंत्यसंस्कार विधी आता सलग तीन सत्रांमध्ये करणे शक्य होणार आहे .

चौकट-

याशिवाय आणखी एक पाउल पुढे जात कैलास स्मशानभूमीसाठी स्वतंत्र गॅस दाहिनी बसविण्याची योजना सातारा पालिकेने आखली आहे .या महत्वाकांक्षी योजनेसाठी नगरोत्थान योजनेअंर्तगत मुबलक निधी उपलब्ध होणार आहे .पालिका या कामाची निविदा प्रसिद्ध करणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले

Adv