जनमाहिती अधिकार कायदा हा अतिशय प्रभावी असून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी ज्ञान आणि योग्य माहिती आवश्यक आहे.ती होण्यासाठी सातारा शहरातील महिला शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार दि.८ मार्च रोजी *”नको भिती , हवी कायद्याची माहिती”* या टॅग लाईनवर आधारित प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे दिशा विकास मंच अध्यक्ष सुशांत मोरे यांनी सांगितले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारा जनमाहिती अधिकार कायदा २००५ पासून अस्तित्वात आला असून त्याबाबत अर्जदार आणि जनमाहिती अधिकारी यांना कायदेशीर तरतुदींनुसार माहिती आवश्यक आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात गेली १५ वर्षे माहिती अधिकार कायद्याचा वापर करत प्रेरणादायी कार्य करुन अनेक प्रकरणे धसाला लावत सातारच्या ‘दिशा विकास मंच’ने विशेष ओळख निर्माण केली आहे. मात्र अर्ज दाखल झाला की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायदेशीर तरतुदींनुसार योग्य माहिती देताना काहीसा ताण येतो.हे लक्षात घेऊन सातारा शहरातील विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी *” नको भिती हवी कायद्याची माहिती”* या टॅग लाईनवर आधारित प्रबोधन आणि विचार मंथन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिशा विकास मंच ने साहित्य सदन , जिल्हा पत्रकार भवन, गोडोली सातारा येथील सभागृहात सकाळी ११ ते १ यावेळेत यशदा – पुणे येथील जनमाहिती अधिकार कायद्याचे तज्ञ प्रशिक्षक ओमकार पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत, यावेळी समाजरत्न पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. अधिक माहिती साठी 9850411163 या नंबर वर संपर्क साधावा अशी माहिती सुशांत मोरे यांनी दिली.