Friday, April 3, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पोटनिवडणुकीसाठी मतदान साहित्याचे उद्या वाटप

पोटनिवडणुकीसाठी मतदान साहित्याचे उद्या वाटप

266
Adv


चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रावर आवश्‍यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप उद्या (शनिवार) केले जाणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी (दि. 26) मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी मतदान केंद्रावर आवश्‍यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत सेक्‍टर अधिकारी आणि संगणक चालकांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षण दिले. कर्तव्ये, जबाबदारी व आवश्‍यक कामकाजाबद्दल सूचना केल्या. निवडणूक समन्वयक प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, इव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड उपस्थित होते.
साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होईल. त्यासाठी 111 कर्मचारी व स्वीकृतीसाठी 148 कर्मचारी, नियंत्रण पथक नियुक्त केले आहे. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदानानंतर रविवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजल्यापासून साहित्य स्वीकारले जाईल. मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची हजेरी, मतदान केंद्राचे साहित्य केंद्राध्यक्षांच्या ताब्यात देणे, ईव्हीएम अर्थात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, मतदान केंद्राचे साहित्य वाटप करून नोंद घेणे ही शनिवारची कामे आहेत, तर इव्हीएम यंत्र ताब्यात घेणे, मतदान प्रक्रियेविषयीची विविध सीलबंद पाकिटे आणि लिफाफे, ताब्यात घेतलेल्या साहित्याच्या नोंदी करणे, ताब्यात घेतलेले साहित्य दिलेल्या सूचनेनुसार व्यवस्थितपणे ठेवणे, ही कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.

Adv