निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्धची सुनावणी लांबणीवर

71
Adv

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला दिले होते. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेची सुनावणी आता १५ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या याचिकेवर सुनावणीसाठी २० नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती. एकीकडे शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरण ३१ डिसेंबर पर्यंत निकाली काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. मात्र शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव याबद्दलची सुनावणी ही लांबणीवर गेली आहे.

नाताळच्या सुट्ट्यांआधी न्यायालयाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस १५ डिसेंबर असतो. १६ डिसेंबर पासून नाताळच्या सुट्ट्या असतात, त्यामुळे या सुनावणीबद्दलचा निर्णय आता थेट २०२४ या वर्षातच होईल अशी शक्यता आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ही याचिका उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यानंतर खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा करत त्यांनी पक्षावर दावा केला होता. पुढे हे प्रकरण निवडणूक आयोगात आले. निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले होते. युक्तिवाद संपल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले होते. यानंतर निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा तत्वांच्या विरोधात आहे, असे म्हणत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबल्याने पुन्हा एकदा ठाकरे गटाला वाट बघावी लागणार आहे.

Adv