जनता सहकारी बँकेतील कर्मचा-यास सेवानिवृत्ती दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर सुपूर्द

420
Adv

भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कोल्हापुर यांच्यावतीने भारत सरकारच्या प्रयास- सेवानिवृत्ती की तिथीपर पेन्शन जारी करने का प्रयास या योजनेतंर्गत जनता सहकारी बँकेचे वसुली विभागाचे व्यवस्थापक सेवानिवृत्त अधिकारी उमेश पाटील यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच कोल्हापुर येथील क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त श्रेणी – I बिरेंद्र कुमार आणि भविष्य निर्वाह निधी आयुक्त श्रेणी – II अमित चौगुले यांच्याहस्ते पेन्शन पेमेंट ऑर्डर (पी.पी.ओ.) सुपुर्त करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हा विशेष उपक्रम भारत सरकारच्या नव्या प्रयास योजनेमुळेच करणे शक्य झाले आहे असे उद्गार काढले. यापुढील काळात बँकेतील जास्तीत जास्त कर्मचा-यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी त्यांची योग्य ती माहिती आमच्या कार्यालयाकडे वेळेत सादर केल्यास आम्ही स्वतः आपल्या बँकेच्या मुख्य कार्यालयात येवून कर्मचा-यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर सुपुर्त करु, यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले.

याप्रसंगी क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित चौगुले, लेखाधिकारी श्रीकांत बरगे, सहा. देखभाल कर्ता सचिन सवाखंडे, बँकेचे प्रशासन अधिकारी मच्छिंद्र जगदाळे, अनिल जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन मिळवण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे अनेक हेलपाटे मारावे लागत होते व तरीही सहा-सहा महिने पेन्शन उपलब्ध होत नव्हती. वृध्दापकाळामध्ये लोकांना औषधोपचार, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशांची अत्यंत निकड असल्याने सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल होत होते, मात्र भारत सरकारच्या पर्यास या उपक्रमामुळे कर्मचा-यांना त्यांच्या सेवानिवृत्ती दिवशीच पेन्शन ऑर्डर मिळणे शक्य झाले आहे त्यामुळे कर्मचा-यांमध्ये अतिशय समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी बँकेचे प्रशासन अधिकारी श्री.जगदाळे यांनी जनता सहकारी बँकेतील सर्व कर्मचा-यांची प्रॉ. फंड वर्गणी, प्रॉ. फंड विमा हप्ता, ग्रुप ग्रॅच्युईटी तसेच बचतगटांतर्गत गटविम्याचे सर्व हप्ते हे बँकेकडून वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे विनाविलंब पाठवले जात असून श्री.पाटील यांची माहे फेब्रुवारी 2022 ची प्रॉ. फंड व पेन्शनची वर्गणी ही एक महिन्यापूर्वीच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पाठविल्यामुळे आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांना पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळाली असल्याचे नमूद करुन यापुढील काळातही सर्व कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कोल्हापुर यांच्यावतीने भारत सरकारच्या प्रयास या योजनेचा लाभ घेता येईल या दृष्टीने बँक व्यवस्थापनाकडून कार्यवाही होईल अशी ग्वाही दिली. तसेच श्री. पाटील यांनी जनता सहकारी बँकेतील सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळणारा मी पहिलाच भाग्यवान कर्मचारी असल्याचे सांगून बँक व्यवस्थापन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त करुन मनःपूर्वक धन्यवाद दिले.

Adv