सातारा शहर आणि तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना संकटामुळे ऑनलाईन पध्दतीने झाली. विशेष म्हणजे 25 फेब्रुवारी शासनाने सहकारी बँकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत मार्गदर्शनक सूचना जाहीर केल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत जनता सहकारी बँक वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी बँक राज्यातील पहिलीच ठरली आहे.
बँकेची 58 वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखा कार्यालयांमध्ये ऑनलाईन पध्दतीने चेअरमन अतुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बँकेचे सर्व संचालक मंडळ व सभासदांनी यामध्ये प्रथमच ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदवला. बँकेने यशस्वीरित्या ऑनलाईन सभेचे आयोजन केले त्यास बँकेच्या सभासदांकडूनही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या सभेस बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, संचालक जयेंद्र चव्हाण, डॉ. चेतना माजगावकर, सौ. सुजाता राजेमहाडिक, वजीर नदाफ, रामचंद्र साठे, अविनाश बाचल, विजय बडेकर, सेवक संचालक अनिल जठार, अनिल चिटणीस तसेच निमंत्रित संचालक अजित साळुंखे यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांनी यावर्षी बँकेने आवश्यक त्या सर्व तरतुदी केलेल्या असल्याचे सांगून बँकेच्या स्थैर्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) रिझवर्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कमीत कमी 9 टक्के राखणे आवश्यक असताना बँकेने हे प्रमाण 15.87 टक्के असे अतिरिक्त राखलेले आहे. सन 2019-20 चा आर्थिक वर्षात बँकेने बँकेच्या स्थापनेपासूनच प्रथमच मेगा भरती केलेली आहे. बँकेस चालू आर्थिक वर्षात 6 लाख 38 हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे. मागील आर्थिक वर्षात थकीत कर्ज वसुली कामी राबवलेले कठोर धोरण चालू आर्थिक वर्षात देखील राबवून एन.पी.ए. कर्जाच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने वसुलीसंदर्भातील सर्व प्रकारच्या कठोर उपाययोजना करण्याचे संचालक मंडळाने निश्चित करुन त्याप्रमाणे अंमलबजावणीही सुरु केलेली आहे. त्याचे चांगले परिणाम या वर्षाअखेर पर्यंत निश्चितच दिसून येतील. त्यामुळे बँकेचा संचित तोटा पूर्ण भरून निघेल व रिझवर्हे बँकेच्या परवानगीने सभासदांना लाभांश ही जाहीर करण्याच्या स्थितीत बँक येईल, असा विश्वास व्यक्त केला.
बँकेचे जेष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. त्यास बहुसंख्य सभासदांकडून ऑनलाईन मंजुरी देण्यात आली. सभेपूर्वी अहवाल सालात दिवंगत झालेले बँकेचे सभासद, खातेदार, पदाधिकारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईक, कोरोना काळात मृत झालेले देशबांधव यांना संचालक मंडळाने श्रध्दांजली अर्पण केली. तसेच 97 व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशील व अक्रियाशील सभासद या विषयांवर सभासदांना राज्य सहकारी संघ पुणे यांच्यामार्फत सहकार विभागाचे सहकार शिक्षणाधिकारी आर.टी.सुरवसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षण दिले. याप्रसंगी बँकेचे संचालक जयवंत भोसले, आनंदराव कणसे, अमोल मोहिते, माधव सारडा, अशोक मोने, अरुणकुमार यादव, निशांत पाटील, चंद्रशेखर घोडके (सराफ), रविंद्र माने, वसंतराव लेवे, नारायण लोहार, तज्ञ संचालक धिरज कासट, ओंकार पोतदार, निमंत्रित संचालक प्रितम शहा, बँकेचे व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, प्रशासन अधिकारी मच्छिंद्र जगदाळे, मुख्य कार्यालयातील सर्व विभागप्रमुख तसेच बँकेतील सर्व अधिकारी व सेवक वर्ग बँकेच्या मुख्य कार्यालय व तसेच शाखा कार्यालयांमध्ये उपस्थित होते.






