हिंदू धर्मामध्ये शंकराचे प्रतीक म्हणून रुद्राक्ष फळ प्रार्थनेसाठी वापरले जाते. अतिशय दुर्मिळ असणारी ही वनस्पती नेपाळ ,बाली किंवा भारताच्या हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागात आढळून येते, पण फक्त या परिसरात या झाडाची फळे मिळणार अशी समज असताना हा समज खोटा ठरवून सातारच्या शरद देगावकर व सौ ,विद्या देगावकर यांनी आपल्या घराच्या गच्चीवर या रोपाची लागवड काही वर्षांपूर्वी केली,आणि आता या झाडाला 20 ते 25 रुद्राक्षाची फळे लागली असून ती पाहण्यासाठी सातारकराची गर्दी होत आहे.
सातारा शहरातील नगरपालिका कार्यालया नजीकच्या देगावकर कुटुंबीयांच्या रंगोली नर्सरी मध्ये सातारकर विविध फळझाडे आणि फुलझाडे खरेदीसाठी नेहमीच येत असतात. वृक्षलागवडीची स्वतःला आवड असल्यामुळे शरद यांनी गेली अनेक वर्षे स्वतः आपल्या इमारतीच्या गच्चीवर अनेक प्रकारचे दुर्मिळ वृक्ष ,तसेच वनस्पती लागवड केली आहे. सहा वर्षापूर्वी त्यांनी या तीन मुखी रुद्राक्ष यांच्या फळाचे झाड आणून लावली. रुद्राक्षाचे झाड पाहण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी गर्दी केली होती .मात्र आता या रुद्राक्षाच्या झाडाला 20 ते 25 फळे लगडली असून रुद्राक्षाचे फळ भगवान शंकराच्या अश्रू पासून निर्माण झाली असे मानले जाते आणि त्याला औषधी महत्त्वही आहे. हे झाड लागवड केली त्या वेळी 10 ते 12 इंचाचे होते .मात्र आता ते चांगलेच बहरले असून चार ते साडेचार फुटाच्या उंचीच्या या झाडाला तीन मुखी रुद्राक्ष लगडली आहेत झाडावरून रुद्राक्षाचे फळ गळून पडल्या नंतर त्याचे साल काढावी लागते तरच आपल्याला रुद्राक्ष पाहायला मिळतो अशी माहितीही शरद देगावकर यांनी प्रतिनिधीला दिली.