सातारा : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सातारा न्यायालयातील दोन न्यायमूर्तींना दणका बसला आहे. एका वरिष्ठ न्यायमूर्तींना पदावनतीला सामोरे जावे लागले असून दुसर्या न्यायमूर्तींना तात्काळ बदली आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी सातारा बार कौन्सिलने प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे आणि तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्यावर काही कारणाने बहिष्कार टाकला होता. तसेच याबाबतची कल्पनाही हायकोर्टाला दिली होती. त्यास अनुसरुन गेले दोन दिवस उच्च न्यायालयाची कमिटी सातार्यात ठाण मांडून होती. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे जाताच उच्च न्यायालयाने प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या पदावनतीचे आदेश काढून त्यांची बदली पुणे येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून केली आहे. तसेच तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांना आजच्या आज व दुपारीच न्यायालयाचे काम सुरु असताना चार्ज सोडून नागपूरला बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बदलीच्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचेही आदेश आहेत.