Sunday, October 11, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City ऐतिहासिक गोलबागेसमोर बेशिस्त पार्किंग

ऐतिहासिक गोलबागेसमोर बेशिस्त पार्किंग

193
Adv

सातारा शहराच्या ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार असलेल्या गोलबाग परिसरात सध्या बेशिस्त पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्रीमंत छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराजांच्या स्मृतीस्थळासमोरच वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात असल्याने ऐतिहासिक परिसराचे सौंदर्य बाधित होत असून नागरिकांनाही वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

राजवाडा परिसरातील पार्किंगचा प्रश्न यापूर्वीही चर्चेत आला असून, प्रशासनाकडून पार्किंग व्यवस्थेबाबत उपाययोजना करण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
गोलबागेसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ‘नो पार्किंग झोन’ जाहीर करून स्पष्ट फलक लावावेत. तसेच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर सातारा वाहतूक शाखेने नियमितपणे कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वाहतूक नियमन करणे हे वाहतूक शाखेचे प्रमुख काम असल्याचे सातारा पोलिसांच्या संकेतस्थळावर नमूद आहे.
ऐतिहासिक वास्तूंचा परिसर पार्किंगसाठी नव्हे, तर इतिहास जपण्यासाठी आहे. त्यामुळे सातारा पालिका आणि वाहतूक शाखेने केवळ सूचना न देता प्रत्यक्ष कारवाई करून गोलबागेसमोरील बेशिस्त पार्किंगला आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकीकडे अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका आणि दुसरीकडे छत्रपतींच्या स्मृतीसमोरच पार्किंगचे अतिक्रमण, हा विरोधाभास नको! सातारा पालिका आणि वाहतूक शाखेने संयुक्तपणे गोलबागेसमोरील परिसर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करून स्पष्ट फलक लावावेत आणि नियमबाह्य पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

Adv