Wednesday, August 26, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City गणेश आगमन मार्गापेक्षा मॅरेथॉनचा रस्ता महत्त्वाचा?

गणेश आगमन मार्गापेक्षा मॅरेथॉनचा रस्ता महत्त्वाचा?

44
Adv

सातारा शहरात गणेशोत्सवाची चाहूल लागली असताना गणेश आगमन व विसर्जन मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे गणेश मंडळे आणि भक्तांची लगबग सुरू असताना दुसरीकडे या प्रमुख मार्गांवरील खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. मात्र समर्थ मंदिर ते नगरपालिका या रस्त्याचे पॅचिंग सुरू करण्यात आल्याने गणेश आगमन-विसर्जन मार्गापेक्षा मॅरेथॉनच्या मार्गाला पालिकेने प्राधान्य दिले का? असा सवाल साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी लाखो भाविक आणि गणेशभक्त ज्या मार्गावरून ये-जा करतात, त्या मार्गाची डागडुजी आधी होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात वेगळ्याच रस्त्याचे पॅचिंग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भाजपची सत्ता असलेल्या सातारा पालिकेत रस्ते पॅचिंगचा ‘श्री गणेशा’ झाला; पण गणेश आगमन-विसर्जन मार्गावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष का? असा थेट प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.
गणेश आगमन आणि विसर्जन सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. अशा वेळी खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि गणेशभक्तांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने प्राधान्यक्रम ठरवून प्रथम गणेशोत्सवाच्या प्रमुख मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मॅरेथॉनचा रस्ता चकाचक करण्याची घाई आणि गणेशोत्सवाच्या मार्गावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष, हा नेमका कोणता प्राधान्यक्रम? याचे उत्तर सातारा पालिका प्रशासनाने आणि सत्ताधारी भाजपने द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया गणेशभक्तांमधून उमटत आहे.

Adv