राजकारणात समीकरण आणि वेळ ही वेळोवेळी बदलतं असते शाहूनगरीच्या राजकीय आखाड्यात सत्ता सुंदरी काही मोजक्याच राजकीय घरांमध्ये नांदते आहे सातारकर गेली पंधरा वर्ष तेच चेहरे निवडून देत असताना शाहूनगरीचा विकास कुठेतरी थांबल्यागत वाटतोय त्यामुळे थोरले जलमंदिर आणि धाकटी सुरुची या सत्ता केंद्रांनी शहरात भाकरी फिरवावी असा आग्रह प्रकर्षाने व्यक्त होतोय .
सातारा म्हणजे दोन राजे त्यांचे प्रभावक्षेत्र आणि सत्तेची सुंदोपसुंदी ही ओळखं सातारकरांनी आळवून आता एका पिढी पन्नाशीकडे झुकली पण शाहूनगरीचे तेच प्रश्न सातारा midc पाण्याची ओरड पार्किंग समस्या वाहतुकीची कोंडी या प्रश्नांना सोडवण्याचा वकूब आणि खासियत खा छ उदयनराजे भोसले व आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात निश्चित आहे मात्र कोनाच्या दोन बाजूमध्ये राजकारणं शिजतय तेच बरं आहे तिसऱ्या कोनान जर अडचणं केली तर करायचं काय ? या जिरवा जिरवीत सर्वसामान्यं सातारकराची जिरली आहे . कार्यकर्ता उबगलाय नवीन अभ्यासू चेहरा पुढे येईनासाच झाला आहे .
शहराच्या विकासापेक्षा एकमेकांचे जिरवा जिरवीचे राजकारणात पाच वर्षात सातारकर यांना बघायला मिळते हे त्रिकाल सत्य असल्याचे सातारकर सुज्ञ नागरिक बोलून दाखवतात टोल नाक्याचा संघर्ष असो की सुरुची राडा प्रकरण असो जे निष्ठेने दोन्ही सत्ताकेंद्रांशी प्रामाणिक राहिले त्यांच्या सरकारी मांडवाखाली हजेऱ्या सुरु आहेत सातार्याचे दोन्ही राजे अशा चेहर्यांना संधी देणार का ? का पुन्हा केसेस आंदोलन घेण्याची त्यांच्यावर वेळ येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे
छ उदयनराजे यांनी संपूर्ण राजघराण्याच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य घरातील गृहिणी माधवीताई कदम यांना नगराध्यक्ष पदी बसविले महाराजांच्या या निर्णयाला सातारकरांची संमंती होती मात्र माधवीताई यांना खुर्चीत बसल्यावर विरोधाच्या राजकारणाचे अग्निदिव्य अनुभवावे लागले त्यामुळेच साताऱ्याच्या राजकारणाने आता जरा कूस बदलावी अशी वेळ आली आहे ज्या कार्यकर्त्यांनी निरपेक्षपणे मावळा म्हणून काम केले त्यांना आता निश्चित संधी मिळायला हवी .
छ उदयनराजे यांच्याकडे ही नवीन फौज गोळा करण्याचे कसब आहे त्यांची नजर राजकारणात मुरलेली आहे त्यामुळे यंदाच्या पालिकेत नवीन चेहरे दिले जावेत ही भविष्यातील साताऱ्याची गरज आहे .
दोन्हीही राजेंच्या बर्याच राजकीय धुरिणांना ओबीसी आरक्षणाने घरी बसवले आहे काही ठिकाणी श्रीं च्या ऐवजी सौ तर सौ ऐवजी श्रींना संधी मिळण्याची शक्यता आहे असे झाल्यास दोन्हीही राजेंच्या तेथील कार्यकर्त्यावर अन्याय होणार हे मात्र नक्कीच याचा फटका आगामी निवडणुकीत टाळायचा असेल तर नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना दोन्हीही राजेंनी उमेदवारी द्यावी हाच पर्याय समोर दिसत आहे
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनाही सातारा तालुक्यासह शहराचा होमवर्क करताना जुने नव्हे तर नवेच चेहरे द्यावे लागतील . ज्या बारा शिलेदारांना सातारकरांनी पालिकेत पाठविले त्यांना सत्ताधारी खासदार गटावर धारदार अंकुश ठेवताच आला नाही . विरोधी पक्षनेत्यांना सुद्धा अनेक प्रकरणांमध्ये ब्र उच्चारला गेला नाही . त्यामुळे हद्वावाढीतल्या नव्या जागांवर किमान निम्म्या जागांवर तरी नवे चेहरे दिसावेत ही सातारकरांची धारणा आहे .
दोन्ही राजांनी थेट मैदानात येऊन खरे निष्ठावंत पालिकेत पाठवावेत साताऱ्याच्या राजकारणात आता खरोखर भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे टेंडर टक्केवारी पेक्षा आपण पालिकेत सातारकरांसाठी जात आहोत याचाच मूळं विसर संबंधितांना पड़लाय .
आता दोन्ही सत्ताकेंद्र तशी भाजपची मात्र कमळाचा सोस अजून त्यांना मानवलेला नाही राष्ट्रवादीच्या तिसऱ्या पॅनेलची नाराज पापभीरू आतुरतेने वाट पहात आहेत शिवसेनेच्या धनुष्य बाणाची प्रत्यंचा मतभेदामुळे इतकी ताणली गेली की धनुष्य मोडायची वेळ ओढविली अशा सैरभैर राजकीय परिस्थितीत दोन्ही राजांनी कलगीतुरा जरूर करावा पण त्यालाही एक उंची आणि मर्यादा निश्चित ठेवावी .
राजकीय आंतरविरोध विशिष्ट रेषेच्या पलीकडे जाऊ नये . साताऱ्याच्या निष्ठावंत मावळ्यांच्या हातात पुढील पाच वर्षाचे राजकारण द्यावे सोबतीला काही अनुभवी चेहर्यांची त्याला जोड असावी ही राजकीय मांडणी दोन्ही नेते जाणतात आणि सातारकरांच्या शब्दालाही मान देतात चला सातारकरांच्या वतीने निष्ठावतांना संधी देण्याचा आम्ही राजेशाही कौल लावला आहे आमच्या माफक आणि यथोचित नवसाला ही सत्ताकेंद्र पावतील अशी अपेक्षा आहे .
संदीप शिंदे… सातारानामा





