जावली तालुक्यातील प्रश्नांबाबत आणि विकास कामांच्या अनुषंगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे नेते शरद पवार साहेबांची सिल्वर ओक येथे भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांना तालुक्यात येण्याची विनंती केली.त्यांनी येण्यास होणार दिला असून दि. 7 जूनला त्यांची कुडाळ येथे सकाळी 11वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.त्यांच्या सभेमुळे जावली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भानुदास भोसले, दादा रासकर, मारुती महामुलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, यापूर्वी विरोधी पक्ष नेते व आमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांची जाहीर सभा जावली तालुक्यात झाली आहे. त्यांच्या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे चांगले चार्ज होवून कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यात चांगले वातावरण आहे. पवारसाहेबांना तालुक्यात आणण्यासाठी मी साहेबांची सिल्वर ओक येथे भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. जावली तालुक्यातील सम्या आणि विकास कामांबाबत त्यांच्याशी बोललो. त्यांना तालुक्यात येण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. त्यांची सभा दि. 7 रोजी कुडाळ येथे सकाळी 11 वाजता होत आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवेंद्रराजेंना पाडणार म्हणजे पाडणार
आमदारकीच्या दृष्टीने तुमची तयारी सुरु आहे काय या प्रश्नावर दीपक पवार म्हणाले, मी विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. माझी सातारा-जावली मतदार संघातून 2024 साठी तयारी सुरु आहे. त्याच निवडणूकीमध्ये आमदार शिवेंद्रराजे यांना पाडणार म्हणजे पाडणारच. त्यांना पाडूनच मी रिटार्यं होणार आहे, असा शब्दच पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिला. दरम्यान, त्यांनी सातारा नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहोत. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्यासमवेत आमच्या दोन बैठका झालेल्या आहेत. आणखी बैठका होणार असून जागा वाटपावर चर्चा होणार आहे. शशिकांत शिंदे हेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते महाविकास आघाडीचे नेते असल्याने तेही पालिकेच्या निवडणूकीत आमच्यासोबत असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बाजार समितीच्या निवडणूकीची नोंद पक्षाकडे झाली आहे
बाजार समितीच्या निवडणूकीत तुमच्या विरोधात राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी होते असा प्रश्न पत्रकारांनी छेडला असता दीपक पवार म्हणाले, जावली बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये एकाधिकारशाही, हुकूमशाही चालू नये म्हणून माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ यांना सोबत घेवून पॅनेल टाकले. ही सहकाराची निवडणूक होती. पक्षीय पातळीवरची निवडणूक नव्हती. तरीही पक्षाकडे ज्यांनी ज्यांनी त्या निवडणूकीत जी भूमिका घेतली होती. त्याबाबतची तक्रार पक्षाकडे झाली असून पक्षाने तशी नोंद घेतली आहे, असेही आर्वजून पत्रकारांनी दीपक पवार यांनी सांगितले.