कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत, सातारा नगरपालिकाही कोणत्याही लंगडया सबबी न सांगता, नागरीकांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी रात्रीचा दिवस करुन, फॉगिंग, सॅनिटायझेशन, कचरा संकलन, रस्ते सफाई, अव्याहन पाणीपुरवठा, आग नियंत्रण कार्ये, यामध्ये कोठेही कमी पडलेली नाही. गेल्या सुमारे एक वर्षापासून सातारा नगरपरिषदेच्या खर्चातुन, एकूण २८०० मयत व्यक्तींवर जरुर ती सर्व दक्षता घेवून अंतिम
संस्कार करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका असावी. तथापि येथुन पुढील काळ आणखीन दक्षता घेण्याचा आहे. भविष्यात पालिकेने आणि नागरीकांनी देखिल अधिक स्वयंशिस्त दाखवून, कोरोनासह अन्य संसर्गजन्य रोगांवर मात करण्याची जिगर बाळगावी लागेल असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना महामारीत संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था कोलमडुन गेली असताना, भारतीय जीवनशैलीची एक वेगळी पध्दत आणि त्यामुळे मुलतः नागरीकांची असणारी जादा प्रतिकारशक्ती या बळावर कोरोना या भीषण संसर्गजन्य रोगाचे होणारे चढ उतार पहात, सातत्याने नियंत्रण ठेवण्यात ब-यापैकी यश मिळत आहे. नागरी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस प्रशासन यांच्या सांघिक जोरावर, कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच, प्रसार झालेल्या लोकांवर वेळीच उपचार करणे अश्या दुहेरी संकटात सुध्दा प्रशासनाने फार मोठया हिकमतीने आलेल्या प्रसंगाला तोंड दिले आहे. जिल्हयातील नागरी संस्थांनी देखिल सार्वजनिक आरोग्य अधिक चांगले ठेवण्यासाठी प्रयत्नांची
पराकाष्ठा केली. सातारा नगरपरिषदेने तीच्या वाढीव क्षेत्रासह सगळीकडे सॅनिटायझेशन, फॉगिंग, जंतुनाशक फवारणी, कचरा नियमितपणे उचलणे, रस्ते सफाई, कन्टेटमेंट झोन जाहिर झाल्यावर करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरुवातीपासून खावली येथील विलगीकरण कक्षातील स्वच्छता, कॅम्प मधील
विलगीकरणकक्ष, इत्यादी कामे चांगल्या पध्दतीने केली.
नागरीकांच्या सार्वजनिक आरोग्याची दक्षता घेत असतानाच, लॉकडाउनमुळे होरपळलेल्या छोटया मोठया व्यावसायिकांच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात गत वर्षीच्या तीन महिन्यांच्या घरपटटीच्या बिलात सुट देवून, प्रामाणिकपणे दिलासा देण्याचे कार्य केले आहे. शहरातील नागरीकांचे लसीकरण देखिल
अत्यंत शिस्तबध्दरित्या कस्तुरबा रुग्णालय आणि कै.दादामहाराज प्राथमिक आरोग्य केंद्र, गोडोली येथुन सुरुवातीपासून करण्यात येत आहे. त्याचा लाभ अनेक व्यक्तींना झाला आहे. शिवाय अधिक लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.







