सातारा तालुका बाजार समितीमध्ये शेतकरी पॅनेलचा चिवट लढा देवून झालेला पराभव हा पराभव जरी असला तरी तो नैतिक विजय आहे असे आम्ही समजतो.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे सुस्तावलेल्यांना आणि मतदारांना गृहीत धरणा-यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घामटा तर काढलाच परंतु पळता भुई थोडी केली ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.झालेला पराभव भविष्यातील संघर्षमय विजयाची नांदी आहे अशी प्रतिक्रीया शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी दिली
आहे.
बाजारसमितीवर गेल्या अनेक वर्षापासून एकाधिकारशाही सुरु आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील गाळे शेती पुरक व्यवसाय सोडून दारु विक्री करणा-यांसह अन्य धनदांडग्या व्यापा-यांना दिले आहेत.बैल बाजार म्हणून असलेली जागेत मानवी बैलोबांचा धुमाकूळ सुरु आहे.परंतु या एकाधिकारशाही
विरोधात,कारखाना कार्यक्षेत्रातील शेतक-यांसह कोणीच आवाज उठवत नव्हते.अन्याय सहन करणे हाच मोठाअन्याय असल्याने, अल्पावधीत शेतकरी संघटनेने निवडणुक लढवण्याची तयारी केली.मुळात गेली अनेक वर्षे सत्तेत असल्यामुळे तसेच बाजार समितीचे त्यांना हवे तसे मतदार त्यांनी तयार करुन घेतल्यामुळे ही निवडणुक आम्हाला सोपी नव्हती. अनेक पध्दतीने त्यांच्या विचारांच्या नसलेल्या शेतक-यांना त्यांच्या हक्कापासून वंचित
राहावे लागत होते. त्यामुळे अनेक प्रकारांनी पिचलेल्या शेतक-यांमध्ये, सभासदांमध्ये सत्ताधा-यांविरोधात असंतोष देखिल दिसत होता.त्यामुळेच आम्ही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय समविचारी शेतक-यांशी चर्चा करुन घेतला.आमच्या प्रयत्नांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याकामी अत्यंत मोलाची साथ मिळाली.बाजार समितीवर एकाधिकारशाही म्हणजे काय हे जवळुन अनुभवणा-यांनी या निवडणुकीत
आम्हाला मनापासून साथ दिली,या सर्वांचे मनापासून निश्चितच आभार मानतोच,तथापि येणा-या काळामध्ये पाशवी सत्ताधिशां कडून,त्यांच्यावर काही अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास,खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली,कायदयाच्या आणि न्यायाच्या माध्यमातुन शेतकरी हितासाठी आमचा संघर्ष सुरुच ठेवणार आहे अशी ग्वाही देखिल देतो.
या 17 एकराचे स्वप्न दाखवून अनेक व्यापा-यांची त्यांनी लुट केली आहे. ती केलेली लुट नगरपरिषदेच्या निवडणुकीत अंगलट येवू नये म्हणून या निवडणुकीत 17 एकर जागेचे तुणतुणे वाजवले. परंतु त्या अगोदर अनेक वर्षांची एक हाती कारभार केलेल्या बाजार समितीतील,एकरांचा हिशेब एकदा मागवा म्हणजे आपले डोळे पांढरे होतील.आपला हा भ्रष्टाचाराचा ढोल साता-यातील सुज्ञ जनता रयतेच्या राजा असलेल्यांच्या साक्षीने फोडल्या शिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांच्या आर्थिक नाडया आवळण्याचे प्रयत्न झाले.दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला. सर्व प्रकारांचा आणि साम,दाम, दंड,भेद यांचा वापर करुन,ही निवडणुक सत्तारुढ अजिंक्यपॅनेलने निवडणुक लढवली.आमदार पती-पत्नी जातीने दोन दोन तास महत्वाच्या पोलिंग बुथवर उपस्थित राहावे लागले. मतदारांचे आगत स्वागत आणि त्यांची विचारपूस करण्यात अजिंक्य पॅनेलची पळताभुई थोडी झालीहोती ही वस्तुस्थिती सर्वांना दिसली. या लढतीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी कमी पडलो त्याचा वस्तुनिष्ठ सखोल
अभ्यास करुन,शेतकरी संघटनेची पुढील रणनिती आखण्यात येईल.या निवडणुकीच्या निमित्ताने सातारचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेतक-यांच्या आणि न्यायाच्या बाजुने उभे राहुन, शेतक-यांला जो भरभक्कम आधार दिला, होणा-या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी ठाम भुमिका घेतली.अनेक वर्षाच्या अनिबंध सत्तेच्या विरोधात, मर्यादित मतदार संख्या असतानाही आम्हाला सरासरी 400 मते मिळाली यातच आमचा नैतिक विजय असल्याचे जाणवते. बाजार समितीच्या गेल्या काही निवडणुका
कधी आल्या आणि कधी झाल्या हे कळत देखिल नव्हते. वातानुकूलीत जागेत बसून, उमेदवार शेतकरीमतदारांवर लादले जायचे, विरोध करण्याचे कुणाचे धाडस होत नव्हते. अश्या प्रतिकुल परिस्थितीत सर्वसत्ताधिश आणि निरंकुश दडपशाही विरोधात मतदार जागा झाला आहे.अन्यायाला विरोध करण्याचे बळ त्याच्यामध्ये येत आहे. येथुन पुढील निवडणुकीत हाच चारशेचा आकडा सत्तांतर घडवून आणल्याशिवाय राहणार
नाही.म्हणूनच शेतकरी संघटना मतदार राजाची नेहमी ऋणी राहील असेही राजु शेळके यांनी नमुद केले आहे.
शेतकरी पॅनेलला ज्यांनी मतदान केले आहे त्या सर्व सन्माननीय मतदारांचे शेतकरी संघटना आभारी आहे. शेतकरी पॅनेलच्या ज्यांनी मते दिली नाही त्यांचेही आम्ही आभार मानतो. येथुन पुढे शेतकरी हित जपण्यासाठी अर्ध्या रात्री हाक मारल्यास, शेतकरी संघटना आणि व्यक्तीशः मी माझे जे कर्तव्य असेल ते सर्व कसब पणाला लावून पार पाडीन अश्या आश्वस्त शब्दात राजु शेळके यांनी बाजार समितीच्या निवडणुक निकालाच्या पार्श्वभुमीवर मतदारांचे आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आभार मानताना,प्रतिक्रीया दिली आहे.






