भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्या जागी भाजप कोणाला संधी देणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रविवारी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. सोमवारी पुन्हा प्रवीण दरेकर यांचं नाव पुढे येत आहे. दरेकर यांच्या खांद्यावर पक्ष अध्यक्ष पदाची जबाबदारी देईल, असं बोललं जात आहे.
भाजपच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पडद्यामागे काम करणारा महत्त्वाचा चेहरा म्हणून प्रवीण दरेकर यांच्याकडे पाहिलं जातं. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचं नाव सर्वात पुढे आहे. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्धवला असताना प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. यावेळी जातीय समीकरण साधताना प्रवीण दरेकर यांच्याही नावाची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.