Wednesday, May 13, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District अजितदादांच्या अकाली निधनामुळे उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस रद्द

अजितदादांच्या अकाली निधनामुळे उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस रद्द

131
Adv

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आपला वाढदिवस असूनही, महाराष्ट्र अद्याप या धक्क्यातून सावरलेला नसल्याने कोणताही सोहळा न करण्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

​अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उदयनराजे यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झालेल्या या मैत्रीचे रूपांतर एका घट्ट ऋणानुबंधात झाले होते, असे सांगताना त्यांनी दादांना ‘कामाचा माणूस’ आणि ‘दिलदार मनाचे नेतृत्व’ असे संबोधले. मैत्रीत अनेकदा वैचारिक मतभेद झाले असले तरी मनभेद कधीच नव्हते आणि राज्याच्या हिताचे दोघांचेही लक्ष एकच होते, असेही त्यांनी नमूद केले. दादांच्या जाण्याने मनाला लागलेला चटका आणि झालेली घालमेल शब्दांत मांडणे कठीण असल्याचे सांगत, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
​या दुःखद प्रसंगामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे. जर कोणाला समाजसेवा करायची असेल, तर त्यासाठी वाढदिवसाचे निमित्त साधू नये आणि त्याचा कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धी करू नये, अशी कडक सूचनाही त्यांनी दिली आहे. माझी ही आंतरिक तगमग आणि भावना सर्व स्नेही व नागरिक समजून घेतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी यंदाचा वाढदिवस पूर्णपणे रद्द केल्याचे जलमंदिर पॅलेस येथून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Adv