सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना वगळून महायुतीतील काही ठराविक नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवण्यासाठी तसेच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीमध्ये जयकुमार गोरे यांचे वर्चस्व रोखण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी एकत्र येत स्वतंत्र रणनीती आखल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपचे संचालक निवडून आणण्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सिंहाचा वाटा असतानाही त्यांनाच या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेचा चेअरमन मुख्यमंत्रीच ठरवणार असल्याचे सूचक विधान केल्याने या निवडीला आता राज्यस्तरीय राजकीय समीकरणांची किनार मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या चर्चेतून होणार की थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारातून, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपच्या संचालकांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खासदार छत्रपती उदयनराजेंना बाजूला ठेवून होणारी ही राजकीय जुळवाजुळव नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, जिल्हा बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही नेत्यांच्या स्वतंत्र बैठकांमुळे अंतर्गत राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या संचालकांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छ उदयनराजेंना बैठकीपासून दूर ठेवले जात असल्याची चर्चा होत असेल, तर पक्षातील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा भाजपमधील घडामोडींकडे लक्ष देऊन नेत्यांमध्ये समन्वय साधावा, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी पक्षांतर्गत मतभेद वाढू नयेत, हीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.






