Saturday, August 29, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा बँकेच्या सभेचा ‘ऑल फोकस’ खासदार उदयनराजेंवर!

जिल्हा बँकेच्या सभेचा ‘ऑल फोकस’ खासदार उदयनराजेंवर!

129
Adv

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या कामकाजापेक्षा राजकीय घडामोडींचीच चर्चा रंगली आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी होते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत लिफ्टमधून व्यासपीठाकडे झालेली त्यांची एन्ट्रीही चर्चेचा विषय ठरली.

व्यासपीठावर पोहोचल्यानंतर उदयनराजे यांनी आपल्या जवळील चाफ्याचे फूल काढून रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले. त्यानंतर दोघेही शेजारी शेजारी बसले. सभा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत दोघांमध्ये हसत-खेळत गप्पा, विनोद आणि चर्चा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सभागृहातील अनेकांचे लक्ष या दोघांकडेच लागले होते.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणातही आवर्जून उदयनराजेंचा उल्लेख केला. बँकेचे सरव्यवस्थापक सरकाळे यांनी खासदार उदयनराजे यांच्याकडून बँकेला कोणताही त्रास नसल्याचा उल्लेख केला होता. त्यावर मिश्कील शैलीत भाष्य करताना रामराजे म्हणाले, “त्यांचा बँकेला त्रास नसला तरी ते नुसते दिसले तरी त्रास होतो.” त्याचवेळी उदयनराजेंबाबत बोलण्याचा अधिकार आणि हक्क आपल्यालाच असल्याचे त्यांनी ज्येष्ठत्वाच्या नात्याने सूचकपणे नमूद केले.

‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मला भीती नाही’

जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीवरही रामराजे यांनी भाष्य केले. “जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मला भीती नाही,” असे स्पष्ट करतानाच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील एक ‘ब्रँड बँक’ असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात बँकेतील सभासदांची पळवापळवी होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, काही सभासदांनी सध्याचेच संचालक मंडळ पुढेही कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेतील या राजकीय संकेतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकंदर, बँकेची वार्षिक सभा असली तरी ‘ऑल फोकस’ मात्र खासदार उदयनराजेंवरच राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Adv