Sunday, August 30, 2026
spot_img
Home Satara District Maan शेखर गोरे करणार शिंदे सेनेत प्रवेश; जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणमध्ये राजकीय...

शेखर गोरे करणार शिंदे सेनेत प्रवेश; जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणमध्ये राजकीय खळबळ

332
Adv

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे १ सप्टेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित राजकीय संधी न मिळाल्याने शेखर गोरे काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर त्यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शिंदे यांच्या शिवसेनेची निवड केल्याचे मानले जात आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. शेखर गोरे यांचा माण आणि खटाव तालुक्यातील राजकीय संपर्क आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला या भागात बळ मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शेखर गोरे यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक राजकीय परिणाम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय गोटावर होण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही गोरे बंधूंच्या राजकीय वाटचालीकडे माण तालुक्याचे लक्ष लागले असून, आगामी जिल्हा बँक निवडणुकीत या नव्या समीकरणाचा नेमका कसा परिणाम होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
शेखर गोरे यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने माण तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, जिल्हा बँक निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

Adv