वाहतूक कोंडी झाल्यानंतरच पोलीस रस्त्यावर उतरतील का, असा सवाल आता सातारकर विचारत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक शाखेतील मनुष्यबळ वाढवून प्रमुख चौकांमध्ये नियमित पोलीस तैनात करण्याची आवश्यकता आहे.
ठराविक वेळेतच वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावर का? बेशिस्त पार्किंगवर कडक कारवाई कधी? असा थेट सवाल सातारकरांकडून उपस्थित होत असून, जिल्हा पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करून गाडीतच बसून राहणाऱ्या चारचाकी वाहनचालकांवरही वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. केवळ वाहनचालकाला गाडी हलविण्यास सांगण्याऐवजी नियमभंगाची दंडात्मक कारवाई केल्यास बेशिस्त पार्किंगला आळा बसू शकतो.
सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे सर्वसामान्य सातारकर अक्षरशः हैराण झाले आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गोलबाग, मारवाडी चौक, देवी चौक आणि मोती चौक या प्रमुख ठिकाणी वाहतुकीची समस्या विशेष गंभीर असल्याचे चित्र दिसत आहे. काही चौकांमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस जवानांची उपस्थितीही सातत्याने दिसून येत नसल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे.
सातारा शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहरातील वाहतूक शाखेतील जवानांची संख्या वाढविण्याची गरज आहे. प्रमुख चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात केल्यास वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.
विशेष म्हणजे, नो-पार्किंगमध्ये चारचाकी वाहन उभे करून त्यातच बसून राहणाऱ्यांवरही कारवाई होण्याची गरज आहे. वाहन रस्त्यावर उभे करून चालक आत बसला आहे म्हणून वाहतुकीचे नियम लागू होत नाहीत, असा गैरसमज दूर करण्यासाठी वाहतूक विभागाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.
वाहतूक शाखेचे अधिकारी माने साहेब, शहरातील नो-पार्किंग झोनमध्ये होणाऱ्या अशा बेशिस्त पार्किंगवर विशेष मोहीम राबवून कारवाई करणार का, असा सवाल सातारकरांमधून उपस्थित होत आहे.
शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केवळ अधूनमधून कारवाई न करता सातत्यपूर्ण वाहतूक नियोजन, पुरेसे वाहतूक पोलीस आणि बेशिस्त पार्किंगवर कठोर कारवाई आवश्यक आहे.
सातारा शहरातील वाहतूक कधी सुरळीत होणार? हा प्रश्न आता सर्वसामान्य सातारकरांना पडला असून, पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभाग याबाबत काय ठोस पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






