सांगली: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारानिमित्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज राज्यातील प्रमुख नेत्यांनी एकत्रित प्रवास करत विकासाचा संदेश दिला.
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगली ते जत आणि जत ते विटा असा एकत्रित प्रवास केला.
या प्रवासादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, विकासकामांचा आढावा तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. जनतेच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि प्राधान्यक्रम यावरही या नेत्यांमध्ये विचारमंथन झाले.
इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा समन्वय साधत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळातही सकारात्मक चर्चा सुरू असून, एकत्रित नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.






