सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारी बैठक आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर टीका करताना, “विरोधकांना निवडणुका आल्या की यशवंतराव चव्हाण यांचे विचार आठवतात, मात्र प्रत्यक्ष विकासकामांच्या वेळी ते दिसत नाहीत,”असा टोला लगावला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, “सर्वसामान्य मतदार आणि तुमच्यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींमुळेच आम्ही आमदार-खासदार झालो आहोत,” असे सांगत कार्यकर्त्यांचे आभार मानले.
बैठकीत भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या सदस्यांना विकासकामांसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उपस्थित पदाधिकारी व सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या ‘डिनर डिप्लोमसी’ची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली असून, भाजप संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजपच्या ‘डिनर डिप्लोमसी’ची जिल्हाभर चर्चा सुरू असताना काही राजकीय वर्तुळांमध्ये मात्र एका दादाच्या नाराजीची कुजबुज ऐकायला मिळत आहे. बैठकीतील छायाचित्रे आणि उपस्थितांच्या चर्चेतून संबंधित नेत्याचा चेहरा पडलेला दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.
“डिनर डिप्लोमसीत कोणाचा राजकीय फायदा झाला आणि कोणाचा चेहरा पडला?” याची चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या चर्चित ‘डिनर डिप्लोमसी’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील यांची उपस्थितीही अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.






