सातारा दि. – शाहुनगरीमध्ये छत्रपती घराण्याचा सामाजिक सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी आणि आधुनिक काळाशी सुसंगत आणि लोकोपयोगी विविध उपक्रम राबवण्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्रित येऊन शाहुनगरी फौंडेशनची स्थापना झाली आहे. या फौंडेशनच्यावतीने कर्तृत्वान महिलांसाठी महाराणी येसूबाई पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना देण्यात आला होता. दुसरा पुरस्कार साताऱ्याच्या ‘अंजिक्य कन्या’ धैर्या विनोद कुलकर्णी यांना जाहीर झाला असल्याची माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार व कला, सहकार, साहित्य, संस्कृती आदी क्षेत्रांत नावाजलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असणारे विनोद सूर्यनारायण कुलकर्णी व प्राथमिक शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी या आदर्श दाम्पत्याची धैर्या ही धाकटी सुकन्या. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच तिला ट्रेकिंगची मोठी आवड आहे. कैलास बागल यांच्यासारखे सुप्रसिध्द प्रशिक्षक लाभल्याने तिने ट्रेकिंगचा अत्यंत अवघड व किचकट वाटणारा छंदही चांगलाच आत्मसात केला आहे. सुप्रसिध्द ट्रेकर्स प्रियंका मोहिते यांनी आयोजित केलेल्या एका कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी तिच्या वडिलांनी सर्वप्रथम तिला प्रवृत्त केले आणि तेथून सुरू झालेली तिची भरारी विविध विक्रम नावावर संपादन करत आणखी भक्कम झाली आहे. तिने पालकांशिवाय वयाच्या 12 व्या वर्षी समुद्रसपाटीपासून 17598 फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प, दक्षिण आफ्रिकेमधील सर्वात उंच आव्हानात्मक 19341 फूट उंचीचे किलीमांजारो हे अवघड शिखर, 5400 फुट उंचीवरील महाराष्ट्रातील कळसुबाई हे शिखर, युरोप खंडातील 18510 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर केले आहे. त्याचप्रमाणे गायन, बुध्दीबळ, रायफल शुटींगच्या विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे. तिने विविध मॅरेथॉन स्पर्धेतही सहभाग घेतला असून तिच्या या कामगिरीची दखल घेऊन तिला दुसरा महाराणी येसूबाई पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. २ मे रोजी शाहुकलामंदिर येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी.जी.बनकर यांची प्रमुख उपस्थिती असून विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळयास सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहनही श्री.छ.वृषालीराजे भोसले यांनी केले आहे.






