सातारा जिल्ह्यातील तरुणांना सातारा शहरात चोरगेमळावर हायटेक स्किल सेंटर उभे केले जाणार आहे .टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 97 कोटी रुपये गुंतवून हा प्रकल्प आणला जाणारा असून या प्रकल्पाची कन्सल्टन्सी चे अधिकारी आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची आज पाहणी केली .सर्वसाधारण सभेत या ठरावाला मान्यता घेऊन या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे .
सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी सातारा नगरपालिका आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूपुरी येथील चोरगे माळ परिसरात अत्याधुनिक व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. हे केंद्र तरुणांना केवळ कौशल्यच देणार नाही, तर कुशल मनुष्यबळ म्हणून तयार करेल. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष पाठपुराव्याला या प्रकल्पाच्या निमित्ताने मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टीसीएसच्या तज्ज्ञ पथकाने शुक्रवारी (दि. ०६) पालिका पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर, शहापूर येथील चोरगे माळ परिसरात केंद्रासाठी प्रस्तावित असलेल्या जागेची पाहणी केली. नगरपालिकेच्या साडेसहा एकर जागेपैकी एक एकर जागा या केंद्रासाठी निश्चित करण्यात आली असून, टीसीएसच्या तांत्रिक पथकाने या जागेला हिरवा कंदील दाखवला आहे.
हे केंद्र सातारा आणि जावळीसह संपूर्ण जिल्ह्यातील तरुणांसाठी एक वरदान ठरणार आहे. सध्याच्या जागतिक स्पर्धेत ज्या तांत्रिक कौशल्यांची गरज आहे, ती कौशल्ये येथे अल्प शुल्कात उपलब्ध करून दिली जातील. टीसीएस ९७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, उर्वरित निधी राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तरुणांना केवळ नोकरीचे प्रशिक्षणच मिळणार नाही, तर त्यांच्या व्यावसायिक प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे, अशी माहिती यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर, गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, शिक्षण सभापती शंकर किर्दत, सभापती अशोक शेडगे, नगरसेवक अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
(चौकट)
तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण
या केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक असणारी पुढील तांत्रिक प्रक्रिया आणि जागेचे अधिकृत हस्तांतरण येत्या काळात सभेच्या मान्यतेने पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे साताऱ्याच्या औद्योगिक व शैक्षणिक विकासाचे एक नवे पर्व सुरू होणार आहे.





