माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सहयाद्री वाचवा मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेतंर्गत त्यांनी अहमदाबाद येथील जीएसटी मुख्य आयुक्त चंद्रकांत वळवी व नातेवाईकांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथे ६४० एकर भूखंड खरेदी करून त्यामधील ३५ एकरावर अनधिकृतपणे रिसॉर्टचे बांधकाम प्रकरण पत्रकार परिषदेत उघड केले होते. आता याप्रकरणी बेकायदा उत्खनन, खाणकाम, वन्यजीव व वन कायद्याचे उल्लंघन करुन पर्यावरणाला धोका निर्माण केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय अधिकारी वाई, कार्यकारी अभियंता महावितरण, सातारा आणि कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा (उत्तर) यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मूळ नंदूरबारचे रहिवासी असलेले चंद्रकांत वळवी व त्यांच्या नातेवाईकांनी झाडाणी हे संपूर्ण गावच विकत घेतले आहे. वळवी यांचे त्याठिकाणी रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे. पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असतानाही त्याठिकाणी खोदकाम, खाणकाम, रस्ते आदी कामे केली असून वनसंपदा व वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाले आहे. संबंधित विभागांच्या परवानग्या घेण्यात आल्या नसताही त्याकडे प्रशासन डोळेझाक करत असून कारवाई न झाल्यास १० जूनपासून उपोषण करणार असल्याचा इशारा सुशांत मोरे यांनी दिला होता. या प्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडेही सुशांत मोरे यांनी लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जितेंद्र डुडी यांनी वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. झाडाणी येथे झालेल्या गैरप्रकारांबाबत प्रांत राजेंद्रकुमार जाधव यांनी महाबळेश्वर तहसीलदारांना दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल सोमवारपर्यंत प्रशासनाला प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी वाई, कार्यकारी अभियंता महावितरण, सातारा आणि कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा (उत्तर) यांना याप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.